बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार का..? पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नाबाबत उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कारखान्याची निवडणूक ही कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढवू इच्छित नाही, परंतु शेतकरी ही निवडणूक लढायला तयार असेल तर…. आम्हीही निवडणूक लढवू”!
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतदारांची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे आगामी काळात माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होणार याबाबतच्या हालचालींना वेग येत असून यंदाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) या गटाकडे आहे,
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेचे निवडणुकी प्रचारा प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचे सुद्धा संकेत दिले होते, याच पार्श्वभूमीवर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष आता लागून आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मागील इतिहास पाहता कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे, आणि रंजन तावरे यांचा एक पॅनल कार्यरत असून, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित ( अजित पवार ) यांच्या गटाचा बाळासाहेब तावरे, आणि विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांचा पॅनल सध्या कारखान्याच्या सत्तेवर आहे, या निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) गटाकडून निवडणूक पॅनल तयार करुन या साखर कारखान्याची निवडणूक लढविली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक दुरंगी का तिरंगी होणार याकडे राजकीय व्यक्तींचे लक्ष लागून आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,” मी स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार नाही, मात्र कारखानाचे शेतकरी अस्वस्थ असल्याचे मला दिसत आहे, अनेक शेतकरी मला भेटतात, कारखान्यातल्या अडीअडचणी मला समजावून सांगतात, यामध्ये शेतकऱ्यांची कृती समिती असेल तर मी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील, बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे, मला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण आणायचे नाही, काही गोष्टी आपण राजकारणापासून बाजूलाच ठेवल्या पाहिजे, कुठलाही राजकीय पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवू इच्छित नाही,तर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर वाटत असेल आपल्यावर अन्याय झाला आहे, आणि ऊस उत्पादक शेतकरी निवडणूक लढवायला तयार असतील तर शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत,
थोडक्यात, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या या इशारामुळे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंच वार्षित निवडणुक निश्चितपणे रंगीतदार बनेल,अशी शक्यता वर्तवली जात आहे, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) आणि चंद्रराव तावरे व रंजन तावरे हे ज्येष्ठ नेते नेमकी कोणती भूमिका घेणार आहेत ? याकडे कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचे लक्ष लागून आहे.
“बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कामकाज हे उत्तम पद्धतीने चालले असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही साखर कारखान्यानी खूप चांगला भाव दिला आहे, यामध्ये राजकारण न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यापुढे सुद्धा आम्ही उत्तम पद्धतीने यशस्वीपणे कार्य करू,” असा विश्वास कारखान्याची विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी दैनिक लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनातूनच या पुढे ही उत्तम कार्य करू – केशवराव जगताप