पुणे : राज्यात नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होण्यास विलंब होत असून पावसाने प्रचंड ओढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठा झपाटय़ाने घटला असून सुमारे ६० धरणांनी पूर्णपणे तळ गाठला आहे. उर्वरित धरणांमधील पाण्याची स्थितीही चिंताजनक आहे. जून महिन्यात राज्यातील सहाही विभागांत असलेल्या धरणांची पाणीपातळी २३ टक्क्यांवर आली असून ती गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जलसंपदा विभागाचे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा प्रादेशिक विभाग आहेत. या विभागांत २९८९ मोठे, तर २५९० मध्यम प्रकल्प आहेत. याखेरीज कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, सिमेंट बंधारे व लहान तलाव आहेत. गेल्या कित्येक वर्षांत मुख्य धरणांच्या क्षेत्रात पावसाळय़ात दमदार पाऊस होत असल्याने आणि जूनमध्ये पावसाला सुरुवात होत असल्याने धरणांमध्ये किमान पाणीसाठा शिल्लक राहतो. मात्र, यंदा बिपरजॉय चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे वेळेवर तयार न होणे, समुद्रात वादळासारखी स्थिती अशा विविध कारणांमुळे केरळमध्ये मोसमी वारे पोहोचण्यास विलंब झाला व त्याची पुढील वाटचालही अडली आहे.

वास्तविक जून महिन्याच्या अखेपर्यंत राज्यात पाऊस सर्वदूर स्थिरावलेला असतो. यंदा वातावरणातील बदलामुळे पाऊस लांबला. त्याचा परिणाम राज्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठय़ावर झाला आहे. राज्यातील ६० हून अधिक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. मोठी धरणे असलेल्या उजनी, कोयना, गोसी खुर्द या धरणांतील पाणीसाठा अतिशय खालच्या पातळीवर पोहोचला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. खडकपूर्णा, बोरगाव अंजनापूर, माजलगाव, मांजरा, रोशनपुरी, सिरसमार्ग, खिराडपुरी, लिंबाला, मदनसुरी, राजेगाव, सीना कोलेगाव, बिंडगिहल, कारसा पोहरेगाव, खुलगापूर, साई, धामणी, बावनथडी, शिरपूर, नंद, धाम डॅम, भावली, चणकापूर, दरणा, काडवा, कारंजवण, पुणेगाव, तिसगाव, वैतरणा, वाघड, वाकीडॅम, दुधगंगा, राधानगरी, तिल्लरी (धामणी), तुळसी, निरा- देवघर, डिंभे, चासकमाण, पिंपळगाव जोगे, वडज, माणिकडोह, घोड, पवना, भाटघर, पानशेत, वरसगाव, गुंजवणी, टेमघर, मुळशी टाटा, लोणावळा टाटा, वलवण टाटा, वारणा, धोम बलकडी, धोम, कोयना, कान्हेर, वीर, उजनी या धरणांचा पाणीसाठा ० ते २० टक्क्यांच्या घरात गेला आहे. सध्याचा राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून २३.०५ टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच काळात २६.७२ टक्के पाणी होते. गतवर्षीच्या तुलतेन पाणीसाठा ३.६७ टक्क्यांनी कमी असल्यामुळे पाऊस आणखी लांबल्यास राज्यात पाणीटंचाईची समस्या अधिक भीषण होण्याची भीती आहे.

कारणे काय?

  • लांबलेला पाऊस
  • कडक उन्हाळय़ामुळे पाण्याचे बाष्पीभवन
  • पाणीचोरी, गळती
  • पाऊस नसल्याने वाढती मागणी
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: States 60 dams water level is very low 4 percent less water storage compared to last year ysh