पुण्यातील एका रेडिऑलॉजिस्टविरुद्ध कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करून राज्यातील डॉक्टरांनी आपली चूक जाहीरपणे मान्य केली आहे. राज्यातील सोनोग्राफी बंदच्या आंदोलनाला घाबरून महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आता डॉ. वैशाली जाधव यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पालिकेचा मूर्खपणाही जगजाहीर होईल. आपली चूक पोटात घेऊन कारवाई करू नये, अशी जाहीर मागणी करताना रेडिऑलॉजिस्टनी दहादा विचार करायला हवा होता. तसे करण्याऐवजी डॉ. जाधव यांना दूर हटवा, असे म्हणणे म्हणजे यापुढे आम्हा सर्वाना मोकळे रान मिळायला हवे, असे सांगण्यासारखे आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटते आहे, याची सर्वात अधिक काळजी खरेतर डॉक्टरांनी, विशेषत: रेडिऑलॉजिस्टनी करायला हवी. परंतु घडते ते उलटेच आहे! गर्भिलगनिदान करताना पसे उकळून मुलींना जन्म घेण्यास नकार देणारे रेडिऑलॉजिस्ट खरेतर राष्ट्रद्रोही ठरायला हवेत. कारवाई करण्यापूर्वी सर्व तपास केला जातो. तसा तो पुण्यातही झाला असणारच. पण सगळे रेडिऑलॉजिस्ट धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, असे सांगत कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी करतात, हे फारच गंभीर म्हणायला हवे.
महापालिकेने डॉ. वैशाली जाधव यांच्यामागे कणखरपणे उभे राहण्याची गरज त्यामुळेच अधिक आहे. कारण काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली, तर आधीच काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळेल. कारवाई होत नाही म्हणून कंठशोष करणाऱ्या सामान्य नागरिकांना या शहरात काही किंमत असेलच, तर डॉ. वैशाली जाधव यांच्या बाजूने समस्त पुणेकरांनी उभे राहायला हवे. सगळेच रेडिऑलॉजिस्ट गर कामे करतात, असे नाही. परंतु सगळेच जण जेव्हा गर काम करणाऱ्याच्या बाजूने उभे राहून आपली ताकद पणाला लावतात, तेव्हा अधिक आश्चर्य वाटते. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. डॉ. वैशाली जाधव यांची कारवाई चूक की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र न्यायालयाचा निकाल काहीही लागो, आम्हास डॉ. वैशाली जाधव यांची बदलीच हवी आहे, असे सांगणे केवळ उद्धटपणाचेच नाही, तर हेकेखोरीचेही आहे.
कोणत्याही नेक अधिकाऱ्याने कायदे आणि नियम यांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली आणि त्याबद्दल त्यालाच शिक्षा झाली, तर भविष्यात कोणीही कारवाई करण्याचा उत्साह दाखवणार नाही. पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्यात असलेला सावळा गोंधळ अनेकदा उजेडात आलेला आहे. तेथील डबक्यातले राजकारण निदान आयुक्तांना तरी माहीत असायला हवे. परंतु त्या राजकारणाचा बळी म्हणून जर डॉ. जाधव यांच्यावर कारवाई झाली, तर सारे पुणे शहरच अनारोग्याच्या खाईत लोटले जाईल. खरेतर आरोग्यप्रमुखांनी त्यांच्याच खात्यातील अधिकारी असलेल्या डॉ. वैशाली जाधव यांना मानसिक पाठबळ द्यायला हवे. ते तसे करताना दिसत मात्र नाहीत. त्यामागे काही काळेबेरे असल्यास आयुक्तांनी आरोग्यप्रमुखांचीच कानउघडणी करायला हवी. ‘स्मार्ट सिटी’च्या जंजाळात आयुक्तांना असल्या ‘छोटय़ा’ गोष्टींमध्ये लक्ष घालायला वेळ नसेलही. पण त्यांनी निदान आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यकच आहे. केवळ समूहाने मागणी केली, म्हणून त्यास शरण जाणे हे केवळ अनैतिकच नव्हे, तर बेकायदाही आहे, याचे भान जर पुण्यातील रेडिऑलॉजिस्टनीच ठेवले नाही, तर सामान्यांना दोष देण्यात काय अर्थ?
रेडिऑलॉजिस्टना कारवाई न होणारा कायदा हवा आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारशी भांडायला हवे आहे. तेथे त्यांची डाळ शिजणार नाही, म्हणून राज्यातील सामान्यांना अडचणींच्या खाईत लोटून ते दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील, तर त्यांच्या पाठीशी कुणीही उभे राहता कामा नये. मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे म्हणून कोल्हापुरात काही वर्षांपूर्वी मोठी मोहीम घेण्यात आली. तेथील सोनोग्राफीची सर्व यंत्रे एकमेकांना जोडून त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातून नियंत्रण ठेवण्यात आले. काय आश्चर्य! मुलींच्या जन्मदरात मोठा फरक दिसू लागला. अशी यंत्रणा पुण्यातही उभी करणे अजिबात अशक्य नाही. कोल्हापुरातील योजनेचे प्रवर्तक गिरीश लाड सध्या पुण्यात व्यवसाय करतात. त्यांनी तयार केलेली संगणक प्रणाली महाराष्ट्र सोडून देशातील अनेक राज्यांनी उपयोगात आणली आहे. रेडिऑलॉजिस्टनी या योजनेचे खरेतर स्वागत करून स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता. ते राहिले बाजूला. उलट आपल्या गरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी संपूर्ण राज्यातील जनतेला वेठीला धरण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्याला सर्वासमक्ष शाबासकी देण्याची आपल्याकडे पद्धत नाही. ती डॉ. वैशाली जाधव यांच्यापासून सुरू करायला हवी. तसे झाले तर पुणे हे देशातील खरे स्मार्ट आणि सुसंस्कृत शहर ठरेल.
मुकुंद संगोराम – mukund.sangoram@ expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा