पुणे : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात आजपासून (१९ फेब्रुवारी) ४ मार्चपर्यंत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत १ लाख रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे. सरकारी रुग्णालये आणि मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालयांत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. त्याबाबतची जिल्हानिहाय जबाबदारी संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा…संरक्षण राज्यमंत्री म्हणाले, संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये भारत…

या कार्यक्रमांतर्गत २०२२ ते २०२५ या तीन वर्षांत २७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे. या मोहिमेसाठी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी आरोग्य संस्थांसह, स्वयंसेवी संस्था, तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा…शिक्षक भरतीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत देखरेख

उद्दिष्टापेक्षा अधिक शस्त्रक्रिया

राज्यात २०२२-२३ मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे ११२.५१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये डिसेंबरअखेरपर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६७.३० टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता १९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत आता जिल्हास्तरावर ही विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statewide cataract surgery campaign launched in maharashtra aims to treat 1 lakh patients for free pune print news stj 05 psg