राज्यातील प्राध्यापकांनी सध्या विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. त्याबाबतच्या शासनाबरोबरच्या चर्चा फिसकटल्यानंतर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेतर्फे ८ मार्चला राज्यभर ‘जेलभरो आंदोलन’ करण्यात येणार आहे.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील प्राध्यापकांनी विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. याबाबत ५ आणि ६ फेब्रुवारीला प्राध्यापकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. मात्र या चर्चेतून काही तोडगा न निघाल्यामुळे प्राध्यापकांनी परीक्षांवरील बहिष्कार कायम ठेवला. आता मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त चुकीचे देण्यात आले असल्याच्या कारणावरून ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा निर्णय प्राध्यापकांनी घेतला आहे. याबाबत एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, ‘‘आमची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काही आश्वासने दिली होती. मात्र, आता या बैठकीचे इतिवृत्त आले त्यामध्ये या आश्वासनांचा कुठेही उल्लेख नाही. शासनाकडून आमची वारंवार फसवणूक होत आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आम्ही जेलभरो आंदोलन करणार आहोत. राज्यातील प्राध्यापक त्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर जमणार आहेत.’’

Story img Loader