परराज्यातील कंपन्यांना महाराष्ट्रातून दूध खरेदी करण्यास बंदी घालणारा निर्णय सरकारशी कोणतीही चर्चा न करता दुग्धजन्य विभागाच्या सहआयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. या निर्णयास स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. दूधउत्पादन शेतकऱ्यांचे सर्व दूध खरेदी केले जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
खडसे म्हणाले,की महाराष्ट्रातील दूधउत्पादक शेतकऱ्यांचे दूध शिल्लक राहत असल्याने राज्यात बाहेरील दूध विक्री न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दुग्धजन्य विभागाच्या सहआयुक्त निलीमा गायकवाड यांनी राज्यातून दूध खरेदी करण्यास बाहेरील कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला. अमूलकडून ११ लाख लिटर, तर इतर कंपन्यांकडून आठ ते नऊ लाख लिटर दूध महाराष्ट्रातून खरेदी केले जाते. बंदीच्या निर्णयामुळे दोन दिवसांपासून तब्बल ४० लाख लिटर दूध शिल्लक राहीले.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गायकवाड यांची बदली करण्यात आली असून, राज्याबाहेरील कंपन्यांना महाराष्ट्रातून दूध खरेदी करण्याची बंदी घालण्याचा निर्णय का घेतला, याबाबत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.