पिंपरी : म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीतील व्यवस्थापकावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी वराळे येथे घडली. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. अजय विक्रम सिंग (वय ३४, रा. हिंजवडी, मूळ – उत्तर प्रदेश) असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत कंपनीचे सुपरवायझर यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे मागील काही वर्षांपासून म्हाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ते कंपनीच्या आवारात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून हेल्मेट घातलेले दोन हल्लेखोर कंपनीच्या आवारात आले. त्यांनी सिंग यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या आणि वराळे- भांबोली गावच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यामध्ये सिंग यांच्या पोटात आणि कमरेच्या खाली गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे: शंभर रुपयांसाठी खून करणाऱ्याला सात वर्ष सक्तमजुरी
प्राथमिक तपासात व्यावसायिक, आर्थिक व्यवहार किंवा खंडणी अशा कोणत्याही कारणावरून हा गुन्हा घडल्याची बाब निदर्शनास आलेली नाही, अशी माहिती म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, राजेंद्रसिंह गौर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.
सिंग यांच्या पोटात एक गोळी तर एक गोळी कमरेच्या खाली लागलेली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू असून पोलिसांची दहा पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.