पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैभवी पालखी सोहळय़ासोबत पंढरीच्या वाटेवर पायी चालून सावळय़ा विठ्ठलाच्या भेटीला जाण्यासाठी वैष्णवजण आतुर झाले आहेत. संतांच्या पालखी सोहळय़ाच्या प्रस्थान सोहळय़ात सहभागी होण्यासाठी सध्या वारकऱ्यांची पावले आळंदी-देहू नगरीकडे वळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांच्या खंडानंतर प्रथमच वारी आणि पालखीचा सोहळा रंगणार असल्याने वारकऱ्यांमध्ये त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. संत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून २० जूनला होणार आहे. त्यानंतर २१ जूनला माऊलींची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमध्ये पायी वारी आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. सलग दोन वर्षे संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला एसटी बसने पंढरपूरला नेण्यात आल्या. पादुका नेण्यापूर्वी आळंदी आणि देहू येथे प्रस्थान सोहळा झाला, मात्र त्याला ठरावीकच वारकऱ्यांची उपस्थिती होती. यंदा मात्र प्रस्थान, पालखी सोहळा आणी पढरीची पायी वारी लाखो वैष्णवांच्या साक्षीने होणार आहे. त्या अनुषंगाने देवस्थान आणि प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. खांद्यावर भागवत धर्माची पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाकरऱ्यांच्या दिंडय़ा सध्या आळंदी आणि देहूच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखाने हरिभक्तीचा अखंड घोषही होतो आहे. हजारोच्या संख्येने दररोज वारकरी आळंदी आणि देहू परिसरामध्ये दाखल होत असून, आजूबाजूच्या परिसरात वारकऱ्यांच्या राहुटय़ा उभ्या राहत आहेत. श्रीक्षेत्रांमधील धर्मशाळांमध्येही वारकरी एकत्र येऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय होत आहे. प्रशासनाच्या वतीने इंद्रायणीच्या काठावर स्वच्छता करण्यात आली असून, घाटावर वारकऱ्यांच्या स्नानासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे, देवस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळय़ाच्या तयारीलाही वेग देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steps vaishnavism across state alandi dehu departure mauli palanquin ysh
Show comments