खडकवासला धरणातील पाणीसाठा ५० टक्क्य़ांच्या आसपास असूनही पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय शनिवारी कालवा समितीच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. येत्या १०-१५ दिवसांतील पावसाची परिस्थिती पाहून पाणीकपातीचा निर्णय घेण्याचे सांगत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाण्याबाबत शहरी आणि ग्रामीण असा भेद न करता सर्वानीच काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची विधान भवन येथे बैठक झाली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, महापौर दत्ता धनकवडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्यासह जिल्ह्य़ातील आमदार या बैठकीस उपस्थित होते.
पाण्याबाबत शहरी आणि ग्रामीण असा भेद न करता सर्वानीच काटकसरीने वापर करण्याचे धोरण स्वीकारावे, असे आवाहन बापट यांनी केले. पर्वती जलकेंद्रातून होणारी गळती रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत. मुंढवा जॅकवेलचे काम पूर्ण करण्याबरोबरच खडकवासला बंदनलिकेचे काम मार्गी लावावे. शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन केल्यास पिण्याखेरीज पाणी उपयोगात आणता येईल. मात्र, महापालिकेने बांधकामांसाठी त्याचप्रमाणे गाडय़ा धुण्यासाठी होत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वापरावर र्निबध घालणे आवश्यक आहे, असेही बापट यांनी सांगितले.
राज्य सरकारचे धोरण पिण्याच्या पाण्याला आहे. मात्र, खरीप हंगामात आलेले पीक पाण्याअभावी मरू नये ही बाब ध्यानात घेऊन शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन १५ दिवसांत पुन्हा कालवा समितीची बैठक घेण्यात येणार आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर त्यासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात यावेत, असा निर्णय या बैठकीमध्ये झाला.
जलसंपदा विभागातर्फे जिल्ह्य़ातील धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठय़ाची माहिती देण्यात आली. खडकवासला धरणामध्ये एकूण १५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. त्यातील पुण्यासाठी ११.३७ टीएमसी पाणीसाठा देता येणे शक्य आहे. शहराला दोनवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी १४ टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला तरच उपलब्ध पाणीसाठा पुरेल. मात्र, सिंचनासाठी पाणीपुरवठा करता येणार नाही, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. हवामानाच्या अंदाजानुसार ४ सप्टेंबपर्यंत मोठय़ा प्रमाणावर पाऊस अपेक्षित नाही. मात्र, परतीच्या मान्सूनचा प्रवास लांबल्यास हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकतो, अशी माहिती हवामान विभागाच्या मेधा खोले यांनी दिली.

बेकायदा पाणीउपसा करणाऱ्यांवर
फौजदारी गुन्हे दाखल करा
धरणातून कालव्यामध्ये पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते. मात्र, कालव्याच्या परिसरात काही ठिकाणी वीजपंप लावून पाण्याचा उपसा केला जात असल्याची बाब आमदारांनी निदर्शनास आणून दिली. अशा बेकायदा पाणीउपसा करणाऱ्यांवर खास भरारी पथके स्थापन करुन जलसंपदा विभागाने कारवाई करावी. दांडगाईने नियमबाह्य़ पाणीउपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत
राज्य सरकारशी संवाद साधणार
पावसाने दिलेली ओढ आणि धरणातील कमी होत चाललेला पाणीसाठा ध्यानात घेता जिल्ह्य़ामध्येही कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी मागणी काही आमदारांनी केली. राज्य सरकारशी संवाद साधण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जिल्ह्य़ामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.