पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे यांची निवड होऊन दोन आठवडे उलटले तरीही महापालिकेकडे मात्र यापूर्वीच्या महापौर मोहिनी लांडे यांचीच नोंद आहे की काय, अशी शंका घेण्यासारखा प्रकार उघड झाला आहे.
महापालिकेच्या वतीने डेंग्यूच्या जगजागृतीचा कार्यक्रम शहरात सुरू आहे. त्याविषयी पालिकेने काढलेल्या पत्रकांवर महापौर म्हणून मोहिनी लांडे यांचाच उल्लेख आहे. ही पत्रके बुधवारी सांगवी व लगतच्या परिसरात वाटली गेली, तेव्हा हा प्रकार उघड झाला. १२ सप्टेंबरला लांडे यांची मुदत संपली. नव्या महापौर म्हणून िपपळे गुरवच्या धराडे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, दोन आठवडय़ानंतरही महापौर बदलल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही, यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहानिशा न करता यापूर्वीची पत्रके वाटण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.