जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शहरात गुप्तचर यंत्रणांकडून सतत घातपाताचे इशारे दिले जात आहेत. त्यानुसार पोलिसांकडून शहरातील बंदोबस्तात वाढ केली जाते, पण शहरात अद्याप ना सीसीटीव्ही कॅमेरे बसले, ना गुप्त माहिती घेणारी यंत्रणा सक्षम झाली. पुणे शहर हे अजूनही दहशतवाद्यांचे ‘लक्ष्य’ असले, तरी पोलीस, गृहविभाग, स्थानिक प्रशासनाने काही धडा घेतलेला दिसत नाही.
पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर शहरात सुरक्षा वाढविण्यात आली. मात्र, दहशतवाद्यांनी पुणे पोलीस व गुप्तचर यंत्रणांना थांगपत्ता लागू न देता १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. त्या दिवशी पुण्यात पाऊस असल्यामुळे बॉम्ब मोठय़ा तीव्रतेने न फुटल्यामुळे जीवित हानी झाली नाही. त्यांतरही पुणे हे दहशतवाद्यांचे कायमचे ‘लक्ष्य’ राहिलेले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट हे येरवडा कारागृहातील संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. त्यामुळे पुण्यात घातपात करण्याची शक्यता आहे. पुणे शहरात नुकताच १२ ते २१ जुलै दरम्यान घातपात होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. त्यानुसार शहरात घातपाताचा इशारा देऊन सर्व पोलीस यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, अधून-मधून घातपाताचे इशारे येत असतात.
पुणे बॉम्बस्फोटानंतर आरोपी पुण्यातच राहत होते. पण, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना त्यांची माहिती मिळू शकली नाही. दिल्ली पोलिसांनी येऊन कारवाई केल्यानंतर त्यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यामुळे पुणे पोलीस गुप्त माहिती गोळा करण्यात कमी पडले आहेत.
‘हल्ला रोखण्यासाठी केवळ बंदोबस्त असून उपयोगाचे नाही, तर गुप्तचर यंत्रणा बळकट असावी लागते. त्याकडे अजूनही दुर्लक्ष होते. आपल्याकडे राजकीय घटनांच्या संबंधित गुप्तवार्तावर अधिक लक्ष दिले जाते, पण दहशतवादी संघटना, घातपातासंदर्भातील माहिती व त्यासारख्या संघटनांच्या माहितीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. पुणे हे नेहमीच दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहे,’ अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
जेएम बॉम्बस्फोट प्रकरणी आठ जणांवर आरोपपत्र
साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इमरान खान वाजिद पठाण (रा. नांदेड), इरफान लांडगे (रा. अहमदनगर), असद खान जमशेदअली खान (रा. औरंगाबाद), फिरोज ऊर्फ हुमजा अब्दुल हमीद सय्यद (रा. शुक्रवार पेठ, पुणे), मुनीब मेमन (रा. पुणे), फारूख शौकत बागवान (रा. पुणे), सय्यद अरीफ ऊर्फ काशीफ सय्यद जफरुद्दीन बियानी (रा. औरंगाबाद), अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जहागीरदार (रा. नगर) या आठजणांना अटक केली. या सर्वावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर ३० एप्रिल २०१३ रोजी मुंबईच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.
पथारीवाले, रिक्षावाल्यांची बैठक, दुकानदारांना सूचना
जंगली महाराज, फग्र्युसन रस्त्यावर आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून लाउडस्पीकरद्वारे दहशतवादी घातपाताबाबात सतर्क राहून संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे, अशा सूचना दिल्या जात आहेत. जेएम आणि एफसी रस्त्यावरील पथारीवाले, रिक्षावाल्यांची बैठक घेऊन त्यांनाही सूचना केल्या जात आहेत. या रस्त्यावरील दुकानदारांना रस्त्याच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार ५० सीसीटीव्ही कॅमरे सुरू आहेत. ते व्यवस्थित चालू आहेत का याची पाहणी केली जाते, अशी माहिती बालगंधर्व चौकीचे पोलीस उपनिरीक्षक एन. आर. केंचे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा