‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील इतिहास जरी चांगला नसला, तरी भारतातील जातीयवादासारख्या गोष्टी संपण्यासाठी गांधी आणि आंबेडकरांची भारताला आजही गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले.
डॉ. गुहा यांच्या ‘गांधी बिफोर इंडिया’ पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिसचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. दिलीप पाडगांवकर यांनी डॉ. गुहांची मुलाखत घेतली. यानिमित्ताने डॉ. गुहा यांनी गांधींच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून इतिहास जिवंत केला. ‘गांधींचा वारसा जागतिक आहे. तो भारताबरोबरच बाकीच्यांचाही आहे,’ असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. गांधी घडवण्यामध्ये दक्षिण आफ्रिकेची महत्त्वाची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. गुहा यांच्या पुस्तकामध्ये महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील आयुष्य मांडण्यात आले आहे. आफ्रिकेमध्ये गांधींबरोबर काम केलेल्या पण काळाच्या ओघात विस्मृतीमध्ये गेलेल्या अनेकांची माहिती त्यांनी पुस्तकातून दिली आहे. प्राणजीवन मेहता, तंबी नायडू, हेन्री आणि मिली पोलॉक, ई. एम. काथलिया यांसारख्या गांधीजींच्या अनेक मित्रांबद्दल डॉ. गुहा यांनी पुस्तकात लिहिले आहे. त्याचबरोबर गांधींच्या काही दोषांबद्दलही त्यांनी लिहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा