समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पुणे विभागातील सर्व छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, विभागातील अद्यापही १९ गावे आणि ७६ वाडय़ांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले की, पुणे विभागात चारा छावण्यांवर आठशे कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शंभर टक्के छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. बंद करण्याच्या पूर्वी पंधरा दिवस अगोदर छावण्यांची अचानक तपासणी केली होती. त्यावेळी ज्या छावण्यात कमी जनावरे आढळली. त्यांना त्या तारखेपासून पैसे कमी देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पुणे विभागात पाणीटंचाईच्या काळात पंधराशे पन्नास टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. मात्र, सातारा ३ आणि सांगलीत १८ पाण्याचे टँकर सुरू आहेत. पुणे, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्य़ातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. विभागात या वर्षी नव्याने तेविसशे सिंमेट बंधारे झाले असून जुने बाराशे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांमध्ये ९५ टक्के भरले असून साडेआठ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
‘संजय दत्त याचा रजेसाठी अर्ज’
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कैदी संजय दत्त याचा संचित रजेचा (पॅरोल) अर्ज आला असून, तो पोलिसांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली. संजय दत्त हा सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याने दीड महिन्यांपूर्वी संचित रजेसाठी अर्ज केला आहे.

Story img Loader