चार पोलीस ठाण्याच्या चौक्यांचे पोलिसांकडूनच स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर तक्रार घेण्यास टाळाटाळ करताना आढळून आलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये म्हणून नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तर, वरिष्ठांनी सांगून देखील कार टेप चोरीची तक्रार न नोंदविणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तर, एका फौजदाराची दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदली करून त्याची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुक्त्याळ यांनी दिली.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिसांकडून ती घेण्यास टाळाटाळ केल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळे मुक्त्याळ यांनी कोंढवा, पिंपरी, सांगवी आणि विमानतळ या पोलीस ठाण्यातील चौक्यांचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यामध्ये विमानतळ पोलीस ठाणे वगळता तीन ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी घेण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केल्याचे आढळून आले होते. त्यामुळे तीन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये, म्हणून नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये एस. डी. जगताप (कोंढवा), डी. आर. थोरात (पिंपरी), आय. एस. मोमीन (पिंपरी), पी. डी. टिळेकर (सांगवी), एस. एम. सुपे (सांगवी) अशी नोटिस पाठविण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या कर्मचाऱ्यांची बदली मुख्यालयात करण्यात आली आहे.
दुसऱ्या प्रकरणात दोघे निलंबित
पिंपरी येथील एका मोटारीतून कारटेप चोरीला गेला होता. त्याची तक्रार घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारदार भेटले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याबाबत तक्रार नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही या प्रकरणी पोलीस हवालदार गोरख शिवराम डुंबरे, दिलीप पोपट लोंढे या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर, त्या पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख यांची बदली भोसरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तिघांची खात्यांर्तगत चौकशी सुरू आहे.

Story img Loader