लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दिवाळीत तोंडावर असतानाच बाणेर भागातील चितळे बंधू मिठाई विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागात चितळे बंधू मिठाई विक्री दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करण्यात आले. दुकान बंद करण्यापूर्वी हिशेब करण्यात आला. काही रक्कम गल्लयात ठेवण्यात आली होती. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटला. चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी एक लाख ४१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांना टिपले आहे. चित्रीकरण तपासून पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

आणखी वाचा-खेड शिवापूर टोलनाका परिसरात एक कोटींचा गुटखा जप्त, कर्नाटकातील गुटख्याची पुण्यात विक्री

गेल्या महिन्यात येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील एका मिठाई विक्री दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरुन नेली होती. त्यानंतर वारजे भागात एका सुकामेवा विक्री दुकानातून चोरट्यांनी सुकामेव्याची पाकिटे, तसेच गल्ल्यातील रोकड चोरुन नेली होती.