लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कर्वेनगर भागात दुचाकीस्वाराने पीएमपी चालकाला मारहाण करुन बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीएमपी चालक ज्ञानेश्वर हरिभाऊ शिंदे (वय ३४, रा. किश्किंदानगर, कोथरुड) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी ते वारजे या मार्गावरील बस कर्वेनगर भागातून निघाली होती. त्या वेळी कर्वेनगर उड्डाणपुलाजवळ एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत होता. दुचाकीस्वार तरुण आणि साथीदाराने पीएमपी बसचालक शिंदे यांना शिवीगाळ केली. दुचाकीस्वार आणि साथीदाराने रस्त्यावर पडलेला दगड काचेवर मारला. बसची काच फुटून चालक शिंदे यांच्या बोटाला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.
शिंदे यांना मारहाण करुन दुचाकीस्वार आणि साथीदार पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.