पुणे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्या येरवडा येथील घरावर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास दगडफेक झाली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. या घटनेमागे काही राजकीय कारण आहे किंवा हा अचानक घडलेला प्रकार आहे, याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
भीमराव बबन कांबळे (वय २३, रा. गांधीनगर, येरवडा), अभय महादेव म्हात्रे (वय ३२, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे व म्हात्रे यांनी बुधवारी रात्री मद्यापान केले होते. हे दोघे मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकलवरून जात असताना घसरून खाली पडले. त्यानंतर त्यांनी कर्णे यांच्या घराच्या दिशेने दगड भिरकावला. हा दगड कर्णे हे झोपलेल्या खोलीच्या खिडकीला लागला. खिडकीची काच फुटण्याचा आवाज झाल्याने घरातील व्यक्तींना जाग आली. घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांना दोघे दिसले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी दोघांना पकडले.
पोलिसांनी या प्रकाराबाबत आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांच्या मोटारसायकलला दुसऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने ते खाली पडले. समोरील मोटारसायकल चालकाल दगड मारत असताना तो चुकून कर्णे यांच्या घराच्या खिडकीला लागला, असे आरोपींनी पोलिसांना सांगितले. मात्र, आरोपींच्या सांगण्यामध्ये तथ्य आढळून येत नसल्याने पोलीस नेमक्या कारणांचा शोध घेत असल्याचे सोंडे यांनी सांगितले.
पालिका स्थायी समिती अध्यक्ष कर्णे यांच्या घरावर दगडफेक
पुणे पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी यांच्या येरवडा येथील घरावर गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास दगडफेक झाली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
First published on: 05-09-2014 at 02:02 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stone throwing on corporator bapurao karne guruji