लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : प्रयोग शाळांमधून प्राण्यांवर केले जाणारे प्रयोग लवकरात लवकर थांबवावेत, अशी मागणी पीपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल्स (पेटा) इंडिया आणि होफ फॉर पॉज यांच्या वतीने शुक्रवारी करण्यात आली. जागतिक प्राणी सप्ताहानिमित्त पेटा आणि होफ फॉर पॉजतर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर प्राण्यांचे मुखवटे घालून जनजागृती करण्यात आली.
पेटा इंडियाचे अथर्व देशमुख, हिरज लालजानी, होफ फॉर पॉजचे निखिल झोपे, सौरभ पन्हाळे, रजनीकांत सोनवणे, ध्रूव खुनेकरी, अनिकेत गजभिये, इवान सॅम्युअल या वेळी उपस्थित होते.
अथर्व देशमुख म्हणाले, ‘प्रयोग शाळांमधून उंदीर, मांजरांसह माकड, श्वान अशा प्राण्यांवर चाचण्या केल्या जातात. त्यांची चिरफाड केली जाते. विषारी रसायनांच्या प्रयोगामुळे मुके जीव अधू होतात. कित्येकदा त्यांचा जीवही जातो. अशा चाचण्या करूनही माणसाच्या हाती काही लागत नाही. मुळात माणसाची आणि प्राण्यांची जैविक रचना वेगळ्या प्रकारची आहे. त्यामुळे अशा प्रयोगांचे निष्कर्ष बऱ्याचदा माणसांना लागू होत नाहीत.’
‘चाचण्यांच्या नावाखाली केवळ मूक्या जीवांचा छळ होतो. प्राण्यांना इजा सहन करावी लागते. आपल्या रक्षणासाठी प्राण्यांच्या जीवावर उठण्याचा माणसाला कोणताही हक्क नाही. स्वीडनसारख्या प्रगत देशांनीही प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांवर बंदी घातली आहे. भारतातही सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीसाठी प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या प्रयोगांवर बंदी घालण्यात आली आहे. आता मात्र प्रयोगशाळांमधून केला जाणारा प्राण्यांचा छळ पूर्णपणे थांबवण्यात यावा,’ असे आवाहन देशमुख यांनी केले.
प्रयोगांसाठी पर्यायी व्यवस्था
प्राण्यांवर केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे निष्कर्ष माणसांसाठी फायद्याचे ठरताना दिसत नाहीत. माणसाची जैविक रचना प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. त्यामुळे प्रयोगशाळेत प्राण्यांवर केले जाणारे प्रयोग माणसांसाठीही जीवघेणे ठरतात. प्राण्यांवर प्रयोग करून त्यांच्यासह माणसाचाही जीव धोक्यात घालण्यापेक्षा ‘इन विट्रो’ आणि ‘इन सिलिको’सारखे पर्यायी तंत्रज्ञान प्रयोगांसाठी प्रभावी ठरत असल्याचे पेटा इंडियाच्या अथर्व देशमुक यांनी सांगितले. ‘आर्टीफिशयल इंटेलिजन्स (एआय) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अस्तित्वात असताना प्राण्यांच्या शरिरासोबत खेळणे थांबवणे गरजेचे आहे,’ असेही देशमुख यांनी सांगितले.