बीआरटी मार्गावर अपघातांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन वाहतूक शाखेकडून या मार्गावर बसशिवाय इतर वाहने चालविणाऱ्यांवर करावाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस आणि वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व बीआरटी मार्गावर पीएमपी बसेस, एसटी बसेस, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांच्या व्यतिरिक्त  इतर वाहने चालविण्यास यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अलिकडील काळात या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बीआरटी मार्गातून वाहने चालविताना आढळून येणाऱ्या सर्व वाहनांवर येत्या सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी बीआरटी मार्गावरून वाहने चालवू नये, असे आवाहन पांढरे यांनी केले आहे.