पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. त्याची सुरुवात मुळा नदीतून पिंपळे निलख येथून करण्यात आली आहे. मात्र यासाठी शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्थांनी विरोध दर्शवला असून सातत्याने आंदोलने केली जात आहेत. रविवारी (२७ एप्रिल) पुन्हा नदी सुधार प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मुळा नदीकाठी आंदोलकांची भेट घेतली. नदी सुधारच्या नावाखाली तसेच शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींनी बनसोडे यांना माहिती दिली. त्यावर बनसोडे यांनी नदी सुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशानभूमी जवळील नदी पात्रा पर्यंत नागरीक व पर्यावरणप्रेमींनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत सुमारे तीन हजार नागरिकांनी सहभाग घेतला. सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या आंदोलनाशी जोडले जात आहेत. नदीकाठी गेल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नदी सुधार योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षतोडीमुळे गतप्राण झालेली झाडे, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राण गमावलेल्या पशु-पक्ष्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी नदी संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. नदी बचाव विषयावर लघुनाटिका सादर करण्यात आली.

नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रकल्पाची मागणी केलेली नसताना देखील प्रशासनाकडून हा नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. नदी प्रदूषण ही ज्वलंत समस्या असताना देखील या प्रकल्पातील अवघा पाच टक्के निधी नदी स्वच्छतेसाठी वापरला जात आहे. तसेच नदी सुधार प्रकल्प राबवताना नदी काठची सुमारे ४० हजार झाडे तोडली अथवा पुनर्रोपणाच्या नावाखाली मारली जाणार आहेत. नदीकाठच्या अनेक देवराया नष्ट केल्या जाणार आहेत. या नदी सुधार प्रकल्पामुळे जैव विविधता नष्ट होणार आहे. नद्यांचे पात्र अरुंद होऊन पुराचा धोका वाढणार आहे. विदेशातील नद्यांचे अनुकरण करून पिंपरी-चिंचवड शहरात नदी सुधार प्रकल्प सुरु केला जात आहे. मात्र परदेशात आता तटबंध काढून नद्या नैसर्गिक रुपात आणण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे असा प्रकल्प राबवताना नदीचे नैसर्गिक पात्र, जैवविविधता आणि नदी प्रदूषणमुक्ती या बाबींवर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलकांचे मत आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. पर्यावरण प्रेमींशी चर्चा करून नदी पात्राची बनसोडे यांनी पाहणी केली. नदी सुधार योजनेच्या नावाखाली होत असलेली बेकायदेशीर वृक्षतोड चुकीची आहे. नदीकाठी भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना बनसोडे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना केली आहे.

या कामाची चौकशी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर नदी सुधार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बनसोडे यांनी दिले. शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत असून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे देखील दाखल झाल्याचे बनसोडे यांना सांगण्यात आले. त्याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, अवैधपणे वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.