शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला धरणातील जलशयात आसपासच्या परिसरातील नागरी वस्त्यांमधून सांडपाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनातही हा प्रश्न विचारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जलाशयाच्या दोन्ही बाजूला १२ ते १५ किलोमीटरपर्यंत सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहे. या वाहिन्यांमध्ये येणारे सांडपाणी जमा करून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारून या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडण्यासह विविध उपयोजना जलसंपदा विभागाकडून प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्यात येत असून तो अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा >>> पुणे : एकाच वर्षात इमारतीचे वीस वेळा व्यवहार ,आरोपींकडून दस्तनोंदणी ; पाच महिलांसह सहाजण अटकेत
खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. त्यामुळे लोकवस्त्यांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही किंवा अपुरी सुविधा आहे. तसेच या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सध्या तरी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हे सांडपाणी थेट धरणाच्या पाण्यात मिसळत आहे. याबाबतच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे धरणात जलप्रदूषण वाढत आहे. याबाबत तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा, पीएमआरडीए आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायत यांची एकत्रित बैठक घेतली होती. हे सर्व रोखण्यासाठी धरण परिसराचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या होत्या.
हेही वाचा >>> फॉक्सकॉनवरून राज्याची दिशाभूल करू नका : पवार
याबाबत जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, ‘खडकवासला परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस दहा-बारा किलोमीटर अंतरापर्यंत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे तयार करण्यात येणार आहे. त्या सांडपाणी वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी गोळा करून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडणे, अशी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचबरोबरच धरणाच्या दोन्ही काठाच्या भागाचे सुशोभीकरण करणे, जैववैविधता जतन करण्यासाठी अन्य उपाययोजना देखील या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. हा आराखडा अंतिम झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.’
हेही वाचा >>> आयोडिनच्या रासायनिक क्रियेमुळे आक्र्टिक्ट ओझोनची हानी; संशोधनातील निष्कर्ष
धरणाच्या जलशयाचा मोठा भाग पीएमआरडीच्या हद्दीत येतो, तर काही भाग हा पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्याबरोबरच पुणेकरांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी या योजना राबविण्यासाठी दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची शिफारस या अहवाल करण्यात येणार आहे. खडकवासला धरणच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे. ते रोखण्यासाठी आणि धरणाच्या परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच तो पूर्ण करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.– ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग