इंदापूर : इंदापूर तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने आंबा आणि फळबागासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील रेडा रेडणी, भोडणी, बावडा, शहाजी नगर, पिटकेश्वर परिसराला जोरदार वादळी वाऱ्याने तडाखा दिला.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. उतरणीला आलेल्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून,  अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा खच पडला आहे. डाळिंब, पपई, केळी बागांचेही नुकसान झाले आहे. वेलवर्गीय आणि तरकारीच्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सध्या शेतकरी गहू पिकाची मळणी आणि कांदा पिकाच्या काढणीमध्ये व्यस्त आहेत. परिसरामध्ये ठिकठिकाणी कांद्याचे पीक काढून त्यावर कांद्याची पात टाकून काही दिवस कांदा चमक येण्यासाठी पातीखाली शेतकरी ठेवत असतात. नंतर पुन्हा कांदा सर्व गोळा करून साठवण वखारीत भरला जातो. मात्र, कांदा पिकाची काढणी आणि साठवणुकीची लगबग सुरू असतानाच मान्सूनपूर्व पावसाने मोठा तडाखा दिला. काढलेला कांदा शेतातच भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. इंदापूर तालुक्यातील हा परिसर कमी पाण्याचा असल्याने तेथील शेतकऱ्यांचा फळबागांकडे कल असतो. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळबाग तसेच शेतकऱ्यांची आंब्याची झाडे आहेत. उन्हाळाभर संभाळलेली पिके  जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.