त्यांची मागणी तशी अगदीच छोटी होती. पीएमपी प्रशासनाच्या दृष्टीने तर ती फारच किरकोळ होती. पण पीएमपीने घेतलेल्या एका निर्णयामुळे शेकडो प्रवाशांना जो त्रास रोज सहन करावा लागत होता तो दूर करण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. अर्ज, निवेदने देणे सातत्याने सुरू होते. मात्र यंत्रणेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तरीही ते खचले नाहीत. चिकाटीने पाठपुरावा करत राहिले आणि या चिकाटीमुळेच त्यांची मागणी सहा महिन्यांनंतर मान्य झाली..
ही कथा आहे सत्त्याहत्तर वर्षांच्या श्रीधर रानडे यांची. पीएमपीकडून कोथरुड डेपो ते पुणे स्टेशन अशी मार्ग क्रमांक ९४ ची सेवा चालवली जात होती. कोथरुड डेपो, शास्त्रीनगर, गुजरात कॉलनी, वनाझ कॉर्नर मार्गे ही गाडी कर्वे रस्त्याने डेक्कन जिमखाना व पुढे स्टेशनकडे जात-येत असे. पीएमपी प्रशासनाने १ जून रोजी अचानक प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता हा मार्ग बंद करून टाकला आणि या मार्गावरुन धावणाऱ्या गाडय़ा शास्त्रीनगर, गुजरात कॉलनी मार्गे न जाता थेट पौड रस्ता, कर्वे रस्त्याने डेक्कन जिमखान्याकडे जाऊ लागल्या. शास्त्रीनगर मधून जाताना या गाडीला चार थांबे होते. ही गाडी आतल्या भागातून जात असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होत होती आणि शास्त्रीनगरमधून जाणारा हा एकच मार्ग होता. त्यामुळे तो बंद करू नये अशी मागणी होती.
हा मार्ग बंद झाल्याचे लक्षात येताच रानडे यांनी ९४ क्रमांकाची सेवा पूर्ववत व्हावी यासाठी पीएमपी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी आधी संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. पाठोपाठ प्रशासनाकडे निवेदने द्यायला सुरुवात केली. अर्ज दिले, स्मरणपत्रेही दिली. पण शास्त्रीनगर ते वनाझ कॉर्नर दरम्यानचा रस्ता अरुंद असल्यामुळे, तसेच तेथील वाहतूक कोंडी व अतिक्रमणांमुळे या मार्गावरील खेपांना उशीर होतो, असे कारण देत रानडे यांची मागणी मान्य केली जात नव्हती. या रस्त्यावरुन पीएमपीची वाहतूक करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत होते.
या भागातील पार्किंग सम-विषम दिनांकांप्रमाणे असूनही त्याचे पालन होत नव्हते हे लक्षात आल्यानंतर रानडे यांनी स्वखर्चाने त्या संबंधीच्या सूचना देणारे छोटे फलक तयार केले आणि ते स्थानिक दुकानदार-व्यावसायिकांना दिले. त्यामुळे पार्किंगला शिस्त लागली. तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठीही त्यांनी सतत प्रयत्न केले. तरीही बंद झालेला मार्ग सुरू केला जात नव्हता. फक्त पत्रव्यवहारच सुरू होता. पण रानडे यांनी चिकाटी सोडली नाही. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांनाही या प्रश्नाची माहिती त्यांनी दिली.
सातत्याने पाठपुरावा आणि प्रवाशांसाठी हा मार्ग पुन्हा सुरू होणे किती आवश्यक आहे याबाबत प्रयत्न सुरू ठेवल्यानंतर पीएमपी प्रशासनानेही रानडे यांचे म्हणणे सहा महिन्यांनंतर मान्य केले आणि ९४ क्रमांकाची सेवा पूर्ववत करण्यात आली. आमच्या भागातून जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे होणारी गैरसोय दूर झाली पाहिजे हाच माझा प्रयत्न सतत सुरू होता. अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन ही गोष्ट त्यांना सांगत राहिलो आणि माझ्या या प्रयत्नांना यश आले, याचा खूप आनंद आहे, असे मनोगत रानडे व्यक्त करतात.