चिन्मय पाटणकर
‘कट्ट्यावरच्या फुकट्यांनो थट्टा करता काय, मागे नसतो घेत मी टाकलेला पाय, माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावरून जाईल, तवा कळेल माझी पावर अन् तुमची लायकी काय’ असे शब्द असलेल्या रॅप गाण्यातून स्पर्धा परीक्षार्थींच्या जगण्याची कहाणी मांडण्यात आली आहे. पहिल्यांदाच स्पर्धा परीक्षार्थींनी मिळून ‘यथावकाश : कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची’ हा चित्रपट तयार केला असून, विशेष म्हणजे चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक अविनाश शेंबटवाड स्वतः स्पर्धा परीक्षेतून तहसिलदार झाला आहे.
यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांचं आयुष्य या पूर्वी ‘ॲस्पायरन्ट्स’ या वेब मालिकेतून समोर आलं होतं. तर आयआयटीतील प्रवेशासाठी धडपडणाऱ्या मुलांवर कोटा फॅक्टरी ही वेब मालिका आली होती. आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी पुण्यात येऊन नराहणाऱ्या तरुण-तरुणींच्या आयुष्याचं वास्तव ‘यथावकाश : कहाणी स्पर्धा परीक्षावाल्यांची’ या चित्रपटाद्वारे मांडण्यात आलं आहे. या चित्रपटातील ‘लाल दिव्याची गाडी’ या रॅप गाण्याचं लेखन आणि संगीत रॅकसन यांचं आहे. स्पर्धा परीक्षेतील अत्यल्प जागा, लाखो परीक्षार्थी, आई-वडिलांनी गहाण टाकलेली जमीन, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात घालवलेल्या खडतर आयुष्यावर रॅप गाण्यातून भाष्य करण्यात आलं आहे. २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
अविनाश शेंबटवाड आता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहे. चित्रपटाविषयी अविनाश शेंबटवाड म्हणाला, मला एफटीआयआयमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा होती म्हणून पुण्यात आलो. पण प्रवेश झाला नाही आणि मी स्पर्धा परीक्षेकडे वळलो. आम्ही स्पर्धा परीक्षार्थींनी मिळूनच चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटासाठी आम्ही मित्रांनीच आर्थिक योगदान दिले आहे. चित्रपटातील अभिनेतेही स्पर्धा परीक्षार्थीच आहेत. त्यांना काही अनुभव नसल्याने सर्वांची कार्यशाळा घेतली. तहसिलदार म्हणून रूजू होण्यापूर्वी चित्रपटाचे काम पूर्ण केले. रॅप हा प्रकारातून स्पर्धा परीक्षार्थींची कैफियत मांडली आहे.