पुणे : भारती विद्यापीठ परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एकाच्या डाेक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. खून झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ४५ वर्ष आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, खूनामागचे कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस कर्मचारी राहुल आवारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. खून झालेल्या व्यक्तीच्य डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याचे आढळून आले. खूनामागचे कारण समजू शकले नाही. खून झालेली व्यक्ती बांधकाम मजूर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.