नाताळ सणानिमित्त अहमदाबाद, बंगळुरु, दिल्ली, गोवा येथून लालचुटूक स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने स्ट्रॉबेरीच्या दरातही वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्ट्रॉबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लास्टिक ट्रेच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे. एका ट्रे मध्ये प्लास्टिकची आठ छोटी खोकी (पनेट) असतात. एका पनेटमध्ये साधारणपणे २०० ग्रॅम स्ट्राॅबेरीची फळे असतात. एका प्लास्टिक ट्रे चे दर प्रतवारीनुसार २०० ते ३५० रुपये दरम्यान आहेत. गेल्या आठवड्यात एका ट्रेचा दर प्रतवारीनुसार १५० ते ३०० रुपये दरम्यान होता, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील स्ट्रॉबेरी व्यापारी सुभाष राऊत यांनी दिली.
हेही वाचा >>> पुणे: पहाटे पाच वाजेपर्यंत ‘चिअर्स’; नाताळ, नववर्ष स्वागतानिमित्त मद्यालये पहाटे पाच वाजेपर्यंत खुली
मार्केट यार्डातील फळबाजारात सातारा जिल्ह्यातील वाई, भिलार, महाबळेश्वर भागातून चार ते पाच टन स्ट्राॅबेरीची आवक होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात स्ट्रॉबेरीच आवक कमी झाली आहे. आवक कमी झाल्याने दर वाढले आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिक भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक भागातून स्ट्रॉबेरीची आवक होत असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यंदा स्ट्रॉबेरीची लागवड चांगली झाली होती. ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या प्रतवारीवर परिणाम झाला. नाताळ, नववर्षानिमित्त स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते. त्यानंतर स्ट्रॉबेरीची आवक टप्प्याटप्प्याने कमी होऊन हंगामाची अखेर होईल, असे त्यांनी नमूद केले.
नाताळात स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी
नाताळात स्ट्रॉबेरीला देशभरात वाढली आहे. अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद या शहरातून स्ट्राॅबेरीला मागणी वाढली आहे. महाबळेश्वर, वाई भागातील शेतकरी स्ट्राॅबेरी परराज्यात विक्रीस पाठवित आहेत.
नाशिकमधील स्ट्रॉबेरी बाजारात गेल्या काही वर्षांपासून नाशिकमधील शेतकऱ्यांनी स्ट्राॅबेरी लागवड करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमधील स्ट्राॅबेरी लागवड यशस्वी झाली आहे. सातारा भागातील स्ट्राॅबेरीप्रमाणे नाशिकमधील स्ट्राॅबेरीची प्रतवारी चांगली आहे.