पनीर, खवा अशा दुग्धजन्य पदार्थांना वर्षभर मागणी असते. सणासुदीच्या काळात पनीर, खव्याच्या मागणीत मोठी वाढ होते. पनीर तर सर्वांचा आवडीचा दुग्धजन्य पदार्थ. मात्र, बाजारात विक्रीस पाठविले जाणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचे प्रकार वेळोवेळी उघडकीस आले आहेत. पनीर, खव्यासह पदार्थातील भेसळ म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असून, खाद्यान्नातील भेसळ रोखण्यासाठी आता कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तर व्हायला हवी. मात्र, ही कारवाई एवढी कडक व्हायला हवी की, भेसळ करण्याचे धाडस होणार नाही. नागरिकांच्या जीवावर उठणारी भेसळ रोखायलाच हवी.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हडपसरमधील मांजरी भागात एका दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या विक्रेत्याच्या गोदमावर छापा टाकला. गोदामात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीरचा साठा करून ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून १४०० किलो पनीर, पनीरसारखी चव असणारी रासायनिक पावडर आणि पामतेलाचा साठा जप्त केला. या कारवाईसाठी पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांची मदत घेतली होती.

मूळात खाद्यान्नातील भेसळ रोखण्याची जबाबदारी ‘एफडीए’वर निश्चित करण्यात आली आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, निर्माते, उपाहारगृहचालकांसह औषध विक्रेत्यांना ‘एफडीए’कडून परवाने दिले जातात. ‘एफडीए’ ही यंत्रणा फक्त परवाने देणे, तसेच परवाना शुल्क निश्चित करण्यापुरती नाही. खाद्यान्नातील भेसळ, गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आहे.

गुढीपाडवा अक्षय तृतीया, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाईला मागणी असते. मिठाई तयार करण्यासाठी हजारो किलो खवा लागतो. पनीरला तर वर्षभर मोठी मागणी असते. मागणी वाढली की पनीर, खवा तयार करणाऱ्याकडून गैरप्रकार सुरू केले जातात. अगदी राजस्थान, गुजरातमधून खवा पुणे, मुंबईतील बाजारपेठेत विक्रीस पाठविण्यात येतो. पुणे, मुंबईतील बाजारपेठ मोठी आहे. या बाजारात चांगले दर मिळतात. त्यामुळे राजस्थान, गुजरातमधील स्थानिक खवा निर्मिती करणारे व्यावसायिक खासगी प्रवासी बसमधून खवा पाठवितात.

पुणे पोलिसांनी यापूर्वी परराज्यातील भेसळयुक्त खवा जप्त केला होता. गणेशोत्सवात तर दरवर्षी भेसळयुक्त खवा जप्त केला जातो. ग्रामीण भागातील डेअरी व्यावसायिक पनीर, खव्याची निर्मिती करतात. अनेक जण जोडधंदा म्हणून पनीर, खवा निर्मिती करतात. तेथे तयार केला जाणारा पनीर, खव्याची तपासणी करण्याची यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे बाजारात विक्रीस पाठविल्या जाणाऱ्या पनीर, खव्यात भेसळ केली की नाही, याची शाश्वती देता येत नाही.

पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातील छोट्या दुकानात अशा पनीर, खवा विक्रीस पाठविला जातो. त्यामुळे अशा भेसळयुक्त पनीर, खव्याच्या विक्रीवर कारवाई करणे अशक्य असते. गणेशोत्सव, दिवाळीच्या आली की, ‘एफडीए’च्या पथकांकडून मिठाई, खवा, पनीरचे नमुने ताब्यात घेतले जातात. हे नमुने प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषणासाठी पाठविला जातात. विश्लेषण अहवाल आल्यानंतर संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाते. मात्र, असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी कारवाईची गरज आहे. सणासुदीपुरती मर्यादित कारवाई केल्यास ती कितपत प्रभावी ठरते, हा देखील प्रश्न उपस्थित होतो.

पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर जप्त केल्यानंतर श्रीगोंद्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार विक्रम पाचपुते यांनी हिवाळी अधिवेशनात भेसळयुक्त पनीर विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. पाचपुते यांनी सभागृहात पनीरचे तुकडे आणले. आमदार पाचपुते यांनी असे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली. पाचपुते यांनी केलेली मागणी स्वागतार्ह आहे. खाद्यान्नातील भेसळ रोखण्यासाठी नियमित आणि प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे. सणासुदीपुरती दिखाऊ कारवाई करणे याेग्य ठरणार नाही. भेसळ करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना आता जरब बसविण्याची वेळ आली आहे.

rahul.khaladkar@expressindia.com

Story img Loader