बाळासाहेब जवळकर balasaheb.javalkar@expressindia.com

पीएमपीच्या अस्वच्छ बस, अनियमितपणा, वाहक-चालकांचे उद्धट वर्तन, रस्त्यात बंद पडणाऱ्या बस व त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न, नियोजनशून्य कारभार अशा विविध प्रकारच्या तक्रारींवर पिंपरीच्या महापौरांनी बैठक घेऊन चर्चा घडवून आणली. त्यातून काही सुधारणा होईल, अशी तूर्त चिन्हे नाहीत. बैठका, चर्चा आणि कागदी घोडे नाचवणे बंद करून पीएमपीचा कारभार सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करायला हवी.

प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून पीएमपीच्या नियोजनशून्य कारभाराविषयी कायम ओरड सुरू आहे. सातत्याने होणाऱ्या तक्रारींच्या सर्व मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी पिंपरीचे महापौर राहुल जाधव यांनी सोमवारी चिंचवड येथील ऑटो क्लस्टरला स्वतंत्र बैठक घेतली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासह महापालिका पदाधिकारी व पीएमपी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीसाठी सर्व नगरसेवकांना निरोप देण्यात आले होते. महापौरांनी तसे पत्रही पाठवले होते. बैठकीसाठी

आगाऊ सूचनाही  मागवण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही बहुतेक नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.  सत्ताधारी आमदारही गैरहजर

राहिले. त्यामुळे प्रवाशांच्या समस्यांशी लोकप्रतिनिधींना फारसे सोयरसुतक नसल्याचे चित्र समोर आले.

मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक जवळपास तीन तास चालली. मात्र, त्यातून ठोस काही हाती लागले नाही. सर्वाधिक चर्चा पीएमपीच्या १५४ कामगारांना पिंपरी महापालिकेत सामावून घेण्याच्या मुद्दय़ावर झाली. याशिवाय, निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न, बंद करण्यात आलेले मार्ग, नवीन मार्ग सुरू करण्याची  मागणी, नगरसेवकांच्या पत्रांना उत्तर दिले जात नाही, त्यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, असे विविध मुद्दे सदस्यांनी मांडले. जेव्हा शहराची लोकसंख्या पाच लाख होती, तेव्हा तीनच आगार (डेपो) होते. आजमितीला २२ लाख लोकसंख्येचा टप्पा ओलांडला असतानाही ही संख्या तेवढीच आहे. त्यामुळे अनेक अडचणी उद्भवतात. ही संख्या वाढवा, बस मार्ग वाढवा, हा मुद्दा बैठकीच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला.

पीएमपीने आगार करण्यासाठी काही जागांची मागणी केली होती, तथापि, त्या जागा दिल्या जात नाही. बीआरटी मार्गात बऱ्याच त्रुटी आहेत, त्याचा फटका बस वाहतुकीस बसतो. भर रस्त्यात पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अनेकांना त्रास होतो. मात्र, याबाबत पीएमपी प्रशासनाला अद्याप तोडगा काढता आला नाही. बसखरेदीत सातत्य नाही.

लोकसंख्येच्या प्रमाणात बस कमी पडतात. खरेदीसाठी पुरेसा निधी नाही. पीएमपीला आर्थिक बाबतीत पुणे व पिंपरी महापालिकेवर अवलंबून रहावे लागते. स्वबळावर पीएमपी चालवली जाईल, अशी शक्यता सध्या तरी नाही.

बैठकीत पीएमपी प्रशासनावर चौफेर हल्ला चढवण्याची संधी उपस्थित नगरसेवकांनी सोडली नाही. यापूर्वी, पीएमपीला अनेकदा लक्ष्य करण्यात आले आहे. तथापि, पीएमपीच्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही, हे वास्तव आहे. या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेल्या किती मुद्दय़ांवर पाठपुरावा होतो आणि सध्याच्या कारभारात किती सुधारणा होते, या विषयी साशंकताच व्यक्त करण्यात येते.

..असाच समंजसपणा विकासकामांमध्ये हवा

पिंपरी महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा, इतर ठिकाणी असलेल्या चांगल्या गोष्टींचा वापर आपल्या शाळांमध्ये करण्यात यावा व त्याचा फायदा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना व्हावा, असा हेतू डोळ्यासमोर ठेवून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नुकताच दिल्लीतील सरकारी शाळांचा पाहणी दौरा केला. तेथील शाळांमधील चांगल्या गोष्टींचे अनुकरण महापालिका शाळांमध्ये करण्याचा निर्धारही त्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि शिक्षण समितीच्या सदस्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. राजकीय पटलावर कितीही मतभेद असले आणि एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी ते सोडत नसले, तरी ही सर्व मंडळी एकत्रितपणे दौऱ्यावर गेली. तेथून आल्यानंतर त्यांचे अनेक गोष्टींत एकमत असल्याचे दिसून येत होते, याचे कौतुक करतानाच, हा समंजसपणा शहराच्या विकासकामांच्या बाबतीतही त्यांनी दाखवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडमून व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader