लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी सकाळपासून रेसकोर्स परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा रेसकोर्स मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील होणारी कार्यकर्त्यांची गर्दी विचारात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. रेसकोर्स परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रेसकोर्सकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सकाळी आठनंतर वळविण्यात आली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
रेसकोर्स परिसरात साध्या वेशातील पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणाची पाहणी पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा पथकाने पाहणी केली आहे. विशेष सुरक्षा पथकाने दिलेल्या सूचनेनुसार या भागातील बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. बाँम्ब शोधक नाशक पथकाने रेसकोर्स परिसराची सकाळी पाहणी केली. सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. रेसकोर्सपासून दीड ते दोन किलोमीटर अंतर पार पाडून कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी यावे लागणार आहे. सभेच्या ठिकाणी शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.