लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून राहिले असून, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तातास तैनात करण्यात आले आहेत. निमलष्करी दलाच्या तुकड्या, तसेच गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत.
बारामती, इंदापूर, पौड, सासवड, भोर, खडकवासला विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रे, तसेच संवेदनशील भागात सोमवारी सायंकाळनंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आली. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदान शांततेत पार पाडणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अतिरिक्त अधीक्षक, ८ उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. दोन हजार ९५३ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे एक हजार ६०० जवान, निमलष्करी दलाच्या ९ तुकड्या बंदोबस्तास तैनात राहणार आहेत.
आणखी वाचा-“खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंची; उद्धव ठाकरेंना राहुल गांधी समोर मुजरा…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका
बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदार संघात दोन हजार ९५३ पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहेत. गृहरक्षक दलाचे जवान, तसेच निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. -पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण