औषध दुकानांत फार्मासिस्टच्या उपस्थितीच्या मुद्दय़ावरून अन्न व औषध प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. औषध विक्रेत्यांच्या संघटनेने सोमवारपासून (१६ डिसेंबर) पुकारलेल्या संपात जे औषध विक्रेते सहभागी होतील, त्यांच्यावर ‘मेस्मा’अंतर्गत (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा) कारवाई करणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तर मेस्माअंतर्गत कारवाई झाल्यास जेल भरो आंदोलन करू, असे म्हणत औषध विक्रेत्यांच्या संघटनाही इरेस पेटल्या आहेत. या वादात रुग्णांचे मात्र औषधांसाठी हाल होणार आहेत.         
या वेळी औषध विक्रेत्यांच्या संघटनेने तातडीच्या वेळी रुग्णांना औषधे पुरवण्यासाठी कोणतेही हेल्पलाइन क्रमांक जाहीर केलेले नाहीत. ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’चे (सीएपीडी) अध्यक्ष संतोष खिवंसरा यांनी पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली. ‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशन’चे सहसचिव जुगलकिशोर तापडिया, सीएपीडीचे खजिनदार रोहित करपे या वेळी उपस्थित होते.  
राज्यात ५५ हजार तर पुण्यात सुमारे ६ हजार औषध दुकाने आहेत. खिवंसरा म्हणाले, ‘‘मागील आंदोलनाच्या वेळी एफडीएकडून मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. औषध दुकानांच्या तपासणीच्या वेळी एफडीए अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या अडचणींचा विचार करावा, तपासणीत जागेवर विक्री बंद करायला सांगणे, परवाने निलंबित वा रद्द करणे अशी कारवाई केली जाऊ नये, विक्रेत्यांना सुधारणेची संधी दिली जावी या आमच्या प्रमुख मागण्या आहेत.’’ १८ तारखेला हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यभरातील केमिस्ट मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
औषध विक्रेत्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जून २०१३ मध्ये समिती स्थापन झाली असली, तरी या समितीची आतापर्यंत एकच बैठक झाली असल्याचे करपे यांनी सांगितले.
मोठय़ा रुग्णालयांतील चोवीस तास उघडी राहणारी औषध दुकाने बंदच्या काळातही सुरू राहणार आहेत. तसेच तातडीच्या वेळी औषधे मिळवण्यासाठी नागरिक एफडीएच्या खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतील-

  • – आर. ए. भिलारे – ९८६७५७१६५५
  • – विनिता थॉमस – ९८२०५६९७५४
  • – डी. एस. चव्हाण – ९८२२०७५६८७

Story img Loader