स्थानिक संस्था करासह (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) किरकोळ विक्री क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातील सर्व व्यापारी संघटनांनी गुरुवारी (७ मार्च) बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व घाऊक आणि किरकोळ माल विक्रीची लाखो दुकाने गुरुवारी बंद राहतील.
पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पुण्यासह राज्यातील अनेक महापालिकांमधील जकात १ एप्रिलपासून रद्द होत असून त्याऐवजी महापालिकांमध्ये एलबीटी लागू होणार आहे. या नव्या कराला व्यापारी संघटनांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. एलबीटी तसेच किरकोळ विक्री क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट- एफडीए) विरोध करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यापारी वर्गाला ज्या अडचणी येत आहेत त्याकडे राज्य व केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे सेटिया यांनी सांगितले.
जकात रद्द होणार अशी घोषणा करण्यात आली असली, तरी जकातीऐवजी एलबीटी हा नवा कर आणला जात असून त्यातील अनेक तरतुदींमुळे व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. स्थानिक संस्था कराच्या अंतर्गत नोंदणी, व्यापारी वर्गाच्या कामामध्ये निष्कारण वाढ, दंडाच्या अवाजवी रकमा, दुकानात जाऊन तपासणीचे अधिकार, जीवनावश्यक वस्तूंना करमाफी, वजनावर जकात असलेल्या वस्तूंच्या करआकारणीबाबतचा निर्णय, असे अनेक प्रश्न एलबीटीमुळे निर्माण झाले असून त्याबाबत महापालिकेने व्यापारी वर्गाबरोबर चर्चा करून त्यातून मार्ग काढणे आवश्यक आहे, असे पूना र्मचटस चेंबरचे म्हणणे आहे.
घाऊक व किरकोळ माल विक्रीची सर्व दुकाने मिळून पुण्यात सुमारे सहा लाख दुकाने असून गुरुवारी हा सर्व व्यापार बंद राहावा,  यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्व संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strike of trader associations on 7th march against lbt
Show comments