पुणे : पीएमपीने भाडेकरार केलेल्या खासगी ठेकेदारांनी रविवारी दुपार पाळीत अचानक संप पुकारला. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील बहुतांश गाड्या मार्गावर धावू शकल्या नाहीत. पीएमपीने स्वमालकीच्या गाड्यांद्वारे सेवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र निम्म्याहून अधिक गाड्या मार्गावर न आल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. संचलन तूट आणि अन्य रक्कम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी थकीत रक्कम द्यावी, यासाठी हा संप पुकारण्यात आला असून पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारंबरोबर प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. संप न मिटल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
खाजगी बस पुरवठादारांनी अचानक संप केल्यामुळे दुपारपाळीमध्ये १हजार ४२१ गाड्यांपैकी ९२३ गाड्या मार्गावर उपलब्ध झाल्या. मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि मे. ओहा कम्युट प्रा. लि. यांनी संपात सहभाग घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून निधी उपलब्ध होणेबाबत मागणी करण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाने पंधरा मार्च २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदारांची देयके देण्यात येणार असून तसे पत्र पीएमपीकडून ठेकेदारांना देण्यात आले आहे. मात्र संप कायम राहिल्याने सोमवारी प्रवाशांचे हाल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मार्गावर ९२५ बसेस उपलब्ध होणार असून इयत्ता दहावी, बारावीचे परीक्षार्थी, नोकरदार यांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.