पिंपरी : डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी १४२ झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध झाल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. १४२ पैकी ६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पुलासाठी अडथळा ठरणारी झाडे तोडण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमींनी आवाज उठविला. झाडे तोडण्याऐवजी पुनर्रोपण करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनाने काही झाडांचे पुनर्रोपण केले जाईल असे सांगितले. वाहतूककोंडी कमी करण्याबरोबरच वृक्षांचे पुनर्रोपण करणे, नागरिकांना येणाऱ्या अडचणी कमी करून पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे महत्त्व समजून घेऊन बांधकाम प्रक्रियेचा स्थानिक वनस्पती आणि जीवजंतूंवर होणारा परिणाम कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. संरक्षण खात्याच्या जमिनीवर असलेल्या झाडांचे मूल्यांकन करून वृक्ष प्राधिकरण समितीने पुनर्रोपण, तसेच वृक्षतोडीस मान्यता दिली आहे. यामध्ये सुबाभूळ, बाभूळ, गुलमोहर आणि रेन ट्री अशा १४२ झाडांचा समावेश आहे. त्यांपैकी ६४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा >>>राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीचा पहिल्यांदाच अभ्यास
पिंपरी परिसरातील नागरिकांची वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी डेअरी फार्म येथील मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दापोडी-निगडी रस्त्याला पॉवर हाॅउस चौकाशी जोडणारा हा उड्डाणपूल झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढत्या मागणीला विचारात घेऊन उभारण्यात येत आहे. चार पदरी असणाऱ्या या उड्डाणपुलामध्ये छोट्या वाहनांसह अवजड वाहने पेलण्याचीही क्षमता असणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी भागातील प्रवाशांचा प्रवास सोईस्कर होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.