पुणे : इराणमध्ये झालेल्या ५४व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने पाच पदके मिळवण्याची कामगिरी केली. भारतीय संघाला सुवर्ण आणि तीन रौप्यपदके मिळाली असून, संघातील सर्व पाचही सदस्यांनी ही पदके पटकाविली.
टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील (टीआयएफआर) होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (एसबीसीएसई) ही माहिती दिली. २१ ते २९ जुलै या कालावधीत इराणमधील इस्फाहान येथे ही स्पर्धा झाली. भारतीय संघातील छत्तीसगढ येथील रिदम केडिया आणि मध्य प्रदेशातील वेद लाहोटी यांनी सुवर्णपदक, तर नागपूर येथील आकर्ष राज सहाय, उत्तर प्रदेशातील भाव्या तिवारी, राजस्थानमधील जयवीर सिंग यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
चंडिगडच्या डीएव्ही महाविद्यालयाचे प्रा. दीपक गर्ग, एसबीसीएसईचे डॉ. शिरीष पाठारे यांनी संघाचे नेतृत्व केले. तसेच प्रा. ए. सी. बियाणी, रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. विवेक भिडे यांचाही निरीक्षक म्हणून सहभाग होता. पदकनिहाय निकालात भारतीय संघ व्हिएतनामसह चौथ्या स्थानी राहिला. चीनने पहिले, रशियाने दुसरे, रोमानियाने तिसरे स्थान प्राप्त केले. स्पर्धेत एकूण १८ सुवर्ण, २५ रौप्य, ५३ कांस्य पदके देण्यात आली. ४३ देशांतील एकूण १९३ विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग होता.
हरितवायू उत्सर्जनामुळे होणारे परिणाम, पॉल ट्रॅपचा वापर करून आयन पकडणे, डॉप्लर कुलिंग टेक्नॉलॉजी, बायनरी स्टार सिस्टिम स्टॅबिलिटी असे स्पर्धेतील विषय होते.गेल्या २५ वर्षांतील फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास भारतीय संघाने ४१ टक्के सुवर्ण, ४२ टक्के रौप्य, ११ टक्के कांस्य पदके, ६ टक्के सन्माननीय उल्लेख अशी कामगिरी केली आहे. तर गेल्या दशकात भारतीय विद्यार्थ्यांनी ४६ टक्के सुवर्ण, ५२ टक्के रौप्य पदके मिळवली आहेत. विज्ञान शिक्षणात उत्कृष्टता मिळवण्याचे ध्येय अधोरेखित करणारी ही कामगिरी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.