वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टीकेच्या फैरी झाडल्या जात आहे. दोनच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा काढला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. त्या टीकेला आज भाजपच्या वतीने उत्तर देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळातच वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प रखडल्याचा आरोप भाजपने केला असून या प्रकल्पासाठी जागाच संपादित केली नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावेळी गली गली मै शोर है! ठाकरे, पवार चोर है अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे म्हणाले की, मावळ आणि महाराष्ट्रातील जनतेची अडीच वर्षांपासून फसवणूक केली जात आहे. २०१९ पासून मावळ भाजप कडून MIDC ने मोबदला द्यावा म्हणून अनेकदा आंदोलने करण्यात आली, परंतु दबावापोटी शेतकऱ्यांचा मोबदला दिला गेला नाही. याची प्रथम चौकशी व्हायला पाहिजे असे भेगडे म्हणाले .
हेही वाचा : लष्करी जवानाच्या घरातून पावणेतीन लाखांचा ऐवज लांबविला
पुढे ते म्हणाले की, जर वेदांता- फॉक्सकॉन कंपनी इथे येणार होती तर २०२१ च्या जानेवारी ते ३० जून २०२२ पर्यंत या कालावधीत वेदांता – फॉक्सकॉन कंपनीने अनेक वेळा या ठिकाणी भेटी दिल्या, जागेची पाहणी केली. पण जागेचा ताबाच प्रशासनाने दिला नाही कारण यासाठी जागाच संपादित केली गेली नव्हती. शेतकऱ्याला मोबदला दिला गेला नाही. वेदांता- फॉक्सकॉन आणि शासनामध्ये कुठलाच करार झाला नव्हता. मग शिलक सेनेचे नेते आदित्य ठाकरे मावळ आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक का करत आहेत? करार झाला असेल तर त्याची प्रत दाखवा असे खुले आवाहन माजी मंत्री भेगडे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.