पुणे : खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरू करून त्यात पादर्शकतेसाठी प्रयत्न, वसतिगृहांच्या संख्येत वाढ करणार, सांस्कृतिक आणि क्रीडा व्यवस्थांचे सक्षमीकरण, रोजगाराभिमुख शिक्षण, शिकाऊ उमेदवारी आणि निवड योजनेच्या विकासाला गती आदी मुद्द्यांचा समावेश असलेला जाहीरनामा विद्यापीठ विकास मंचाने सावित्रीबाई फुले पुणे अधिसभेच्या पदवीधर निवडणुकीसाठी प्रसिद्ध केला. विद्यापीठ विकास मंचाची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. मंचाचे समन्वयक राजेश पांडे, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. अपूर्व हिरे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे आदी या वेळी उपस्थित होते. अधिसभेतील पदवीधर गटातील दहा जागांसाठीची निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे, तर २१ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा >>> महापालिकेत नोकरीच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक; तीन जणांना अटक
शिक्षण, विद्यापीठ हे पक्षीय राजकारणाच्या वर आहे. संस्थाचालक गट, प्राचार्य गटाच्या निवडणुकीचे चित्र पुढील दोन दिवसांत स्पष्ट होईल. पदवीधर गटाच्या निवडणुकीत ३०-३५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होत नाही. मतदान ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. विविध माध्यमातून प्रचार केला आहे. मतदार नोंदणी वाढवली आहे, असे पांडे यांनी सांगितले. पदवीधर निवडणुकीत पसंतीक्रम पद्धतीचे मतदान होते. ही अत्यंत किचकट प्रक्रिया असते. या निवडणुकीसाठी सहा महिन्यांपासून तयारी केली आहे, असे डॉ. एकबोटे यांनी नमूद केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले प्रगती पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलचेही उमेदवार पदवीधर गटाच्या रिंगणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.