फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याचा संदेश प्रसिद्ध करून चिंचवडमधील एक महाविद्यालयीन युवक गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता म्हणून तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अभिजित भगवान व्यवहारे असे या युवकाचे नाव आहे. आकुर्डीतील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तो शिकतो. गुरुवारी रात्रीपासून अभिजितचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने फेसबुकवर ‘हे जग सोडून आपण जात आहोत’, असा संदेश प्रसिद्ध केला. त्यानंतर त्याचा कोणताच ठावठिकाणा न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेची भावना आहे. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तपास करीत आहेत.
मम्मी, पप्पा तुमचा अभी तुमची स्वप्ने पूर्ण करू शकत नाही. आय अॅम सो सॉरी.. असाही संदेश त्याने फेसबुकवर टाकला आहे. त्याचबरोबर त्यांनी काही मित्रांना उद्देशून, मित्राला मदत करायची असती रे, पण तुम्ही तुमच्या मित्राचा मजाक बनवला रे, असा संदेश फेसबुकवर टाकला आहे. 
(सोबतचे छायाचित्र अभिजितच्या फेसबुक वॉलवरून)

Story img Loader