निवडणुकांच्या तोंडावर ‘कामाला लागा’ अशा सूचना मिळाल्यावर विद्यार्थी संघटना आता मुद्दय़ांच्या शोधात आहेत. त्याचवेळी महाविद्यालयांमध्येही आता ‘आप’ च्या टोप्या दिसू लागल्यामुळे विद्यार्थी संघटनांना नवा धोका जाणवत आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत विद्यार्थी संघटनांचा दबदबा होता. मात्र, विद्यार्थ्यांशीच संपर्क तुटलेल्या संघटनांना सध्या मुद्दे शोधण्याची वेळ आली आहे. बहुतके विद्यार्थी संघटना या पक्षांशी जोडलेल्या आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी संघटनांना कामाला लागण्याच्या, सक्रिय होण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. मात्र, तरुणांशी जोडल्या जाण्यासाठी विद्यार्थी संघटनांना मुद्दय़ांची वानवा भासत आहे.
पुण्यामध्ये किमान सात ते आठ विद्यार्थी संघटना आहेत. मात्र, पुणे विद्यापीठ किंवा महाविद्यालये यामध्ये गेल्या वर्षभरात कोणताही मोठा मुद्दा विद्यार्थी संघटनांनी उचलून तडीला नेलेला नाही. एके काळी चळवळींची संस्कृती निर्माण करणाऱ्या विद्यार्थी संघटना आज विद्यार्थ्यांना माहीतही नाहीत. विद्यार्थी संघटनांच्या एखाद्या आंदोलनाला २५ विद्यार्थ्यांची हजेरीही खूप म्हणावी अशी अवस्था दिसत आहे. त्यातच आता निवडणुकांच्या तोंडावर काम करण्याचे आदेश आल्यामुळे विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी सध्या विषयांच्या शोधात आहेत. परिणामी, प्रश्नपत्रिका कठीण होती, परीक्षेत मला कमी गुण मिळाले, नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलावे, अशा मागण्या घेऊन विद्यार्थी संघटना लुटुपुटूची आंदोलने करत आहेत. मुद्दय़ापेक्षाही प्रसिद्धीझोतात येण्यासाठी संघटनांची धडपड दिसत आहे. त्यातच गेली अनेक वर्षे स्थिरस्थावर झालेल्या संघटनांना आता ‘आप’ चा धाक वाटू लागला आहे. आपकडे वाढणारा विद्यार्थ्यांचा ओढा आणि महाविद्यालयांच्या बाहेर आपचे सदस्यत्व घेण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची गर्दी यामुळे विद्यार्थी संघटना आता हादरल्या आहेत.
‘‘गेली काही वर्षे सगळ्याच चळवळी थंडावल्या आहेत, विद्यार्थी संघटनाही त्याला अपवाद नाहीत. त्यातच पद्धतशीर इव्हेंट मॅनेजमेंट करणाऱ्या संघटनांकडे विद्यार्थी ओढले जात आहेत, हे खरे आहे. सध्या फास्ट फूड, फास्ट लाईफ, फास्ट पब्लिसिटी आणि इन्स्टंट सबजेक्ट असे समीकरण विद्यार्थी संघटनांच्या कामातही दिसत आहे.’’
– डॉ. अभिजित वैद्य, अध्यक्ष सोशालिस्ट युवजन सभा
‘‘विद्यार्थी संघटनांकडे मुद्दे आहेत आणि त्यावर संघटना कामही करत आहेत. अनेक मुद्दय़ांना विद्यार्थी संघटनांनी न्याय मिळवून दिलेला आहे.’’
– विवेकानंद उजळंबकर, पुणे प्रदेश मंत्री, अभाविप