लोणावळा पोलिसांनी पालकांसमोर दिली समज
लोणावळ्यात व्हाट्सऍप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून विद्यार्थी एकमेकांमध्ये फिल्मीस्टाईल भिडले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाणामारी करणारे विद्यार्थी हे VSP शाळेतील असल्याचं लोणावळा पोलिसांनी सांगितलं आहे. पालकांसमोर हाणामारी करणाऱ्या मुलांना पोलिसांनी समज दिली आहे अशी माहिती लोणावळा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी दिली आहे.
हेही वाचा <<< पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत ६ हजार ७३७ विद्यार्थ्यांना प्रवेश
व्हॉटसऍप ग्रुपमध्ये घेतलं नाही म्हणून दहावीतील विद्यार्थ्यांनी फिल्मी स्टाईल हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. गुरुवारी शाळा सुटल्यानंतर दोन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली, ते एकमेकांना ते शिवीगाळ करत होते, तेवढ्यात दुसऱ्याने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटातील काही मुलं समोरासमोर आली आणि लाथा- बुक्क्यांनी फिल्मी स्टाईल हाणामारी करण्यास सुरूवात केली.
पाहा व्हिडीओ –
दरम्यान, तेथील नागरिकांनी पुढे येऊन मारहाण मिटवण्याचा प्रयत्न केला. मारहाण करणाऱ्या दोन्ही गटातील मुलांना शाळा परिसरातून हुसकावून लावण्यात आलं. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी विद्यार्थी आणि पालकांना बोलावून त्यांच्या समक्ष मुलांना समज दिली आहे.