बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी थेरगाव परिसरात घडली.
संजय दत्तात्रय विभुते (वय १८, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. संजय याने बारावीची परीक्षा दिली होती. बुधवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्याने ऑनलाइन निकाल पाहिला. अनुत्तीर्ण झाल्याने तो निराश झाला होता. घरी आल्यानंतर तो खोलीत गेला. दरवाजा बंद करून त्याने छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा बाहेरून वाजविला. मात्र, संजय याने प्रतिसाद न दिल्याने खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.