पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण व्हावी, त्यांना आवश्यक पुस्तके, मागर्दशन व अन्य सुविधा मोफत मिळाव्यात या हेतूने महापालिकेने निगडीत सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्राला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. या केंद्रात आजमितीला १७२७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून होतकरू विद्यार्थ्यांसाठी ते वरदान ठरते आहे. अशा केंद्रांची उपयुक्तता लक्षात घेत शहरातील सहाही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
यापूर्वीचे आयुक्त आशिष शर्मा यांच्या काळात निगडीत अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक केंद्रात स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती करण्यात आली. या ठिकाणी १७२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सवडीप्रमाणे दररोज १५० विद्यार्थी लाभ घेताना दिसतात. प्रशस्त अशा इमारतीत स्वतंत्र कक्ष असून प्रत्येकाला बसण्याची वेगळी व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांसाठी १५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून महत्त्वाची वर्तमानपत्रे व आवश्यक मासिके वेळोवेळी दिली जातात. सप्टेंबर २०१३ पासून दर महिन्याला उच्च पदस्थ, तज्ञ अधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात.
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विवेक कुलकर्णी, यशदाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक शरद पाटील, उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, श्रीकुमार चिंचकर, तुषार ठोंबरे यांनी आतापर्यंत व्याख्याने दिली आहेत. या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी २०१४ च्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश मिळवले असून राज्यात दुसरा येण्याचा मान संदीप जाधव यांनी मिळवला. जिल्हा उपनिबंधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, ज्योती शिवाजी जाधव आणि मिताली संचेती यांची नगरपालिका मुख्याधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. आगामी काळात शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक स्पर्धा परीक्षा केंद्र राहील, याचे नियोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी म्हणतात…
खासगी क्लास लावण्याची आर्थिक परिस्थिती नाही. पालिकेने मोफत सुविधा दिली, एकांत व शांतता असते. रोज १२ तास अभ्यास करू शकतो. हवी ती मासिके, वर्तमानपत्रे, पुस्तके उपलब्ध असतात. चांगली व्याख्याने होतात. त्याचा निश्चित उपयोग होईल.
– माधव दगडे, वाल्हेकरवाडी
.
अतिशय उत्तम सोयी-सुविधा असलेले हे पहिले स्पर्धा परीक्षा केंद्र आहे. पैसे भरूनही अशी सुविधा मिळणार नाही. पुरेसा वेळ मिळतो, चांगली पुस्तके मिळतात, विद्यार्थ्यांच्या सूचनांची दखल घेऊन अधिकारी सहकार्य करतात.
– सोनाली गायकवाड, आकुर्डी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students competition exam centre boon