महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख अखेर जाहीर झाली असली, तरी बहुतेक विद्यापीठांची पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षाही त्याच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आणि आयोगासमोरही आता नवे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख आयोगाने जाहीर केली असून आता ही परीक्षा १८ मे ला होणार आहे. मात्र, या नव्याने जाहीर झालेल्या तारखेमुळेही विद्यार्थ्यांचा गोंधळ अधिकच वाढला आहे. १८ मे ला राज्यातील बहुतेक विद्यापीठांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची त्रेधा उडणार आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी बाहेरगावी केंद्र निवडलेल्या विद्यार्थ्यांना तर कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही नेहमी रविवारीच होते. मात्र, मे महिन्यातील जवळपास सर्व रविवारी कोणत्या ना कोणत्या परीक्षा असल्यामुळे आयोगाने या वर्षी परीक्षा शनिवारी ठेवली आहे. त्यातच २६ मे ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा आहे. या दोन परीक्षांमध्येही फक्त ८ दिवसांचा कालावधी असल्यामुळे या दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थीही हवालदिल झाले आहेत.
याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले, ‘‘परीक्षा घेण्यासाठी नजीकच्या काळात कोणताही रविवार उपलब्ध नाही. सर्व रविवारी आयोगाच्या विविध परीक्षा आहेत. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा शनिवारी जाहीर करावी लागली आहे. परीक्षा १८ मे ला घेण्याशिवाय आयोगापुढे दुसरा कोणताही पर्याय नाही. विद्यापीठांनी त्यांच्या पातळीवर या परिस्थितीमधून तोडगा काढावा.’’ प्राध्यापकांनी परीक्षांच्या कामावर टाकलेल्या बहिष्कारामुळे परीक्षा घेताना अनेक अडचणींना तोंड देणाऱ्या विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. याबाबत पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. बाळासाहेब नाईक यांनी सांगितले, ‘‘१८ तारखेला पुणे विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि कला, वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा आहे. या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी बसले आहेत. त्यामुळे या परीक्षांचे पुन्हा नियोजन करणे हे व्यवहार्य ठरणारे नाही.’’
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती नष्ट झाली होती. उमेदवारांची माहिती आणि त्याचा बॅकअप एकाच हार्डडिस्कवर ठेवण्याचा निष्काळजीपणा आयोगाला भोवला होता. या पाश्र्वभूमीवर परीक्षा देणारे उमेदवार, क्लास चालक, विद्यार्थी संघटना, राजकीय संघटना यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ एप्रिलला होणार होती.
 पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नव्या तारखेचा अधिक फटका बसणार आहे. पुणे विभागातून सर्वाधिक उमेदवार राज्यसेवा पूर्वपरीक्षा देत आहेत. पुणे विभागातून ५३ हजार ६७५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, नाशिक विभाग जो पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात येतो, त्यातील २३ हजार २४३ उमेदवार राज्यसेवा पूर्व परीक्षा देत आहेत. मुंबई विभागातून २५ हजार ४८९, नागपूर विभागातून  १८ हजार ५९८, औरंगाबाद विभागातून १८ हजार २७४, कोल्हापूर विभागातून १२ हजार ६०२, ठाणे विभागातून १२ हजार ४६४ उमेदवार राज्यसेवा पूर्वपरीक्षा देत आहेत.

Story img Loader