‘फर्ग्युसन’मधील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ

फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीचे खुले व्यासपीठ असलेली ‘किमया’ ही वास्तू तीन तपांची झाली आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही देखणी वास्तू वास्तुविशारदाच्या जीवनामध्येही ‘किमया’ घडविणारी ठरली आहे.

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे पुलंचे साहित्य, कर्तृत्व आणि दातृत्व असे विविध पैलू उलगडले जात आहेत. पुलंच्या देखरेखीखाली पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर साकारले गेले. तर, त्यांच्या संकल्पनेतून फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये १९८३ मध्ये ‘किमया’ हे अभिव्यक्तीचे अनोखे व्यासपीठ साकारले गेले. ज्येष्ठ वास्तुविशारद माधव आचवल यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशातून पुलंनी ही संकल्पना आकाराला आणली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी वास्तू साकारणारे वास्तुविशारद सुहास दिघे यांच्या जीवनामध्ये किमया घडून आली आहे. किमया साकारताना मला पुलंचा सहवास लाभला हे माझे भाग्य तर आहेच, पण ही अनोखी वास्तू साकारल्याबद्दल मला इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी या दिल्लीच्या संस्थेतर्फे ‘भारत भूषण अ‍ॅवॉर्ड’ने गौरविण्यात आले, अशी आठवण दिघे यांनी सांगितली.

जपानमधील ग्रीक-रोमन खुले रंगमंच पाहिल्यानंतर अशी वास्तू आपल्याकडेही असली पाहिजे, असे पुलंना वाटले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि किमया या खुल्या रंगमंचाची संकल्पना सांगितली. हा विषय त्यांनी छान उलगडून सांगितला होता, असे सांगून दिघे म्हणाले,की बिंदू जोडून रेषा निर्माण होते. रेषा जोडल्यावर आकृती आणि आकृती एकमेकांना जोडल्यानंतर आकार घडविला जातो. या आकारामध्ये अवकाश असतो. हा अवकाश कलाकारांना उपयोगी ठरतो, अशा शब्दांत पुलंनी मला सांगितले होते. ही वास्तू कमीत कमी बंदिस्त आणि अधिकाधिक खुली असावी. म्हणजे कलाकारांना खुलेपणाने अभिव्यक्त होता येईल ही पुलंची भूमिका मला साकारता आली, असेही दिघे यांनी सांगितले.