बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांवर पुणे विभागीय मंडळाने पुढील काही परीक्षा देण्यास मनाई केली आहे.
राज्य मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र बहुतेक वेळा देत असलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण करणे, दंड वसूल करणे अशीच कारवाई मंडळाकडून केली जाते. गैरप्रकारात आढळलेल्या विद्यार्थ्यांची सुनावणी घेऊन पुढील कारवाई निश्चित केली जाते. या वर्षी नगर येथील एका विद्यार्थ्यांला विभागीय मंडळाने पुढील पाच परीक्षा देण्यास मज्जाव केला आहे. त्याचप्रमाणे ३ विद्यार्थ्यांना दोन परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. हे विद्यार्थी सोलापूर आणि पुणे येथील आहेत. मार्च २०१५ मध्ये झालेल्या परीक्षेदरम्यान हे विद्यार्थी गैरप्रकार करताना पकडले गेले होते. या परीक्षेत पुणे विभागात कॉपीची साधारण ५० प्रकरणे उघडकीस आली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये मात्र त्यांना त्यांची चूक कळावी असा उद्देश कारवाईमागे असतो. मात्र गंभीर स्वरूपाची चूक विद्यार्थ्यांने केली असल्यास त्याला परीक्षेला बसण्यासाठी मनाई करण्यात येते. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची कारवाई झाली नव्हती, अशी माहिती मंडळातील कर्मचाऱ्यांनी दिली.

Story img Loader