गेनबा सोपानराव मोझे तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तंत्रशिक्षण विभागाने दंड न भरल्यामुळे अडवली असून तंत्रशिक्षण विभाग आणि महाविद्यालयातील वादामुळे मनस्ताप मात्र विद्यार्थ्यांना होत आहे.
तंत्रशिक्षण विभागाची परवानगी न घेता महाविद्यालय सुरू केल्याबद्दल २००६-७ साली सुरू केलेल्या गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयाला तंत्रशिक्षण विभागाने दंड केला होता. पहिल्या वर्षी या महाविद्यालयामध्ये १५७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते, त्याप्रमाणे दुप्पट शुल्क दंड म्हणून आकारण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयाला ६५ लाख ९४ हजार रुपये दंड झाला. त्यापैकी ४२ लाख ९४ हजार रुपये दंड महाविद्यालयाने अजूनही भरलेला नाही. त्यामुळे तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची २०११-१२ ची ५ लाख ९४ हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती अडवली आहे. इतके होऊनही, महाविद्यालयाने चालू वर्षांचा शिष्यवृत्तीचा प्रस्तावाच वेळेत न दाखल केल्यामुळे विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून तो प्रस्तावही अमान्य करण्यात आला आहे. महाविद्यालय आणि तंत्रशिक्षण विभागातील या वादामुळे विद्यार्थ्यांना मात्र शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे.
‘‘महाविद्यालयाने अर्ज केला, तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिष्यवृत्ती देऊ. शिष्यवृत्ती देण्याची शासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, महाविद्यालयाकडून कुठलीच मागणी करण्यात आलेली नाही. महाविद्यालयाने दंड भरणेही आवश्यक आहे. मात्र, महाविद्यालयाच्या पातळीवर काही कार्यवाही होत नाही. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी महाविद्यालयाकडे शिष्यवृत्तीची मागणी केली पाहिजे, विद्यार्थ्यां महाविद्यालयाकडे मागणीच करीत नाहीत.’’
– डॉ. प्र. वि. सरोदे, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक
————
‘‘व्यवस्थापन मंडळाला सांगून तंत्रशिक्षण विभागाच्या सर्व अटी पूर्ण केल्या जातील. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी महाविद्यालयाकडून घेतली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली जाईल.’’
-डॉ. जयंत भुरसे, प्राचार्य, मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय.