मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले
राज्यात सुमारे २७ हजार ग्रामपंचायत असणारी गावे आहेत. या प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी जाहीर केले.
हेही वाचा- ‘शिखररत्न कांचनजुंगा’ पुस्तकाचे प्रकाशन; गिरिप्रेमी’च्या थरारक मोहिमेचे अनुभवकथन शब्दबद्ध
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालक डॉ. अपर्णा राजेंद्र आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राज्यात १२ हजार गावांमध्ये ग्रंथालये आहेत आणि सुमारे २७ हजार ग्रामपंचायती असणारी गावे आहेत. वाड्या धरून ४३ हजार गावे आहेत. ग्रामपंचायत असणाऱ्या प्रत्येक गावात किमान ‘ड’वर्गाचे ग्रंथालय सुरू झाले पाहिजे असे उद्दिष्ट ठेवण्याच्या सूचना ग्रंथालय संचालनालयाला दिल्या आहेत. त्यांना पहिल्या दिवसापासून ‘ड’ वर्गाचे अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात चारही वर्गातील ग्रंथालयांना अनुदान वाढविण्यात आले आहे.
हेही वाचा- विश्लेषण : उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आव्हानात्मक कशी ठरणार?
‘मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पॉलिटेक्निकची परीक्षादेखील मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठी भाषेतून सांगणारे यंत्रदेखील विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
हेही वाचा- येरवडा कारागृहातल्या कैद्यांची सुबक कारागिरी! आकर्षक वस्तूंचा दिवाळीसाठी भरला मेळावा
फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन
पुण्यात दोन ठिकाणी फिरते ग्रंथालय चालविण्यात येत आहेत. अशा फिरत्या ग्रंथालयांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे’ असे पाटील यांनी सांगितले.