लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट या प्रवेश परीक्षेत राज्यातील विद्यार्थी मराठी माध्यमाकडे पाठ फिरवत असल्याचे स्पष्ट झाले. नीट परीक्षा मराठी माध्यमातून देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आलेख घटता असल्याचे यंदाच्या निकालावरून दिसून आले.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर केला. यंदा देशभरातील ४ हजार ९७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. २० लाख८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या २० लाख ३८ हजार ५९६ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४५ हजार ९७६ विद्यार्थी पात्र ठरले. राज्यातील २ लाख ७७ हजार ९०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २ लाख ७३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३१ हजार ८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
आणखी वाचा-डॉ. अनिल रामोड यांनी निकालासाठी प्रलंबित ठेवलेल्या ३७४ प्रकरणांचे गूढ; ‘सीबीआय’कडून चौकशी
नीट ही परीक्षा एकूण १३ भाषांमध्ये देता येते. त्यात सर्वाधिक १६ लाख ७२ हजार ९१४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून, त्या खालोखाल २ लाख ७६ हजार १८० विद्यार्थ्यांनी हिंदीतून परीक्षा दिली. मराठीतून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आलेख घटता असल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले. २०१९मध्ये ३१ हजार २३९ विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिली होती. त्यानंतर २०२०मध्ये ६ हजार २५८, २०२१मध्ये २ हजार ९१३, २०२२मध्ये २ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाला पसंती दिली होती. तर यंदा केवळ १ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा पर्याय निवडला होता.