गणेश यादव
पिंपरी : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासह सक्षम करणे, कौशल्य विकसित करण्यासाठी सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पाचवी ते आठवीच्या एक हजार १८९ विद्यार्थ्यांनी कोडिंगच्या जगात पहिले पाऊल टाकले. या वर्गांद्वारे कौशल्यासह तांत्रिक सर्जनशीलता, समस्या सोडवण्याची क्षमता, नवकल्पनांना चालना मिळणार आहे.
महापालिकेच्या ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. संगणक प्रणाली, कोडिंग शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून पाय जॅम फाउंडेशनच्या माध्यमातून पालिकेच्या सात शाळांमध्ये मोफत कोडिंग वर्ग सुरू केले आहेत. हे वर्ग आठवड्यातून दोनदा दोन तास घेतले जात असून, तीन ते चार वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. या वर्गांद्वारे विद्यार्थी केवळ कौशल्य शिकत नाहीत. तर, तांत्रिक सर्जनशीलता, अनुभवात्मक संगणक विज्ञान शिक्षण, समस्या सोडवण्याची क्षमता आणि नवकल्पना वाढवत आहेत. भविष्यात तंत्रज्ञान, अभियांत्रिकी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्यासाठी विद्यार्थी तयार केले जात आहेत.
आणखी वाचा-पुण्यातील ३४ समाविष्ट गावांतील सांडपाणी वाहिन्यांचे काम निकृष्ट? आता होणार पोलखोल
‘कोडिंग’ म्हणजे काय?
संगणक वापरत असताना फक्त बाहेरून सुरू असलेली प्रक्रिया आपल्याला दिसते. पण, ही प्रक्रिया घडण्यासाठी जी काही रचना तयार केलेली असते त्याला ‘कोडिंग’ असे म्हटले जाते. ‘कोडिंग’ला संगणकाची भाषा असेही म्हटले जाते. या कोडिंगचा वापर करून संकेतस्थळ, गेम किंवा उपयोजन (ॲप) तयार करता येतात. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि रोबोटिक्ससारख्या गोष्टी सुद्धा कोडिंगद्वारे तयार करता येऊ शकतात. कोडिंग करण्याच्या सी, सी प्लस प्लस, जावा, एचटीएमएल पायथॉन अशा अनेक भाषा आहेत.
सात शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग
चिंचवडमधील पानसरे उर्दू शाळा, हुतात्मा चाफेकर मुले शाळा, भोसरीतील वैष्णवमाता प्राथमिक शाळा, पिंपळेगुरव प्राथमिक शाळा क्र ५४, सोनवणे वस्ती प्राथमिक शाळा क्र ९३, यशवंतराव चव्हाण उर्दू शाळा, थेरगाव, संत तुकारामनगर मुले प्राथमिक शाळांमध्ये ‘कोडिंग’ वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-स्वारगेट-कात्रज रस्त्यासाठी कोट्यवधींची उधळण…आतापर्यंत ‘एवढे’ कोटी रस्त्यात
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासह सक्षम करण्यासाठी ‘कोडिंग’ वर्ग सुरू करण्याबरोबरच दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, त्यांना शारीरिक व मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी दर शनिवारी दप्तरविना शाळा भरते. विद्यार्थी गायन, कविता, प्रश्न मंजुषा स्पर्धा, शब्दांचे खेळ, पाककलेत सक्रियपणे सहभागी होतात. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, उत्साह वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात सात शाळेत ‘कोडिंग’ वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये एक हजार १८९ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. पालिकेच्या सर्व शाळेत वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाच्या मदतीने ३०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. -शुभम बडगुजर, प्रकल्प व्यवस्थापक, पाय जॅम फाउंडेशन