लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची उंदीरचाव्यांपासून सुटका होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांनुसार, विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांतील उंदीर, ढेकणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना केल्या आहेत.

विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उंदीर, ढेकणांचा उपद्रव सहन करावा लागत होता. उंदराच्या चाव्यामुळे एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यापीठाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह परिसरात स्वच्छता ठेवण्यासह मुलांचे वसतिगृह क्रमांक सहाच्या छतांच्या पत्र्यांची डागडुजी, जुने पत्रे बदलणे, वसतिगृहप्रमुख आणि वसतिगृह सहायक नेमणे, उंदीर निर्मूलनासाठी प्रशासनाकडून वसतिगृह परिसरात-खोल्यांमध्ये औषधफवारणी, महापालिकेकडून वसतिगृह परिसरात उंदीरनाशक औषधेही टाकणे अशा उपाययोजना करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी खोलीत खाद्यपदार्थ उघडे ठेवू नयेत असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. तसेच विद्यापीठ परिसरातील आरोग्यकेंद्रात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार असल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

Story img Loader